माडग्याळ, वार्ताहर
माडग्याळ ता. जत येथील शेळ्या मेंढ्या साठी प्रसिद्ध असणारा दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भरणारा आठवडा बाजार आज बकरीईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भरला होता 25 हजारापासून ते एक लाख रुपये किमतीपर्यंत बकऱ्यांची विक्री झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी राज्यात माडग्याळचा बाजार प्रसिद्ध आहे. माडग्याळी मेंढीसाठी देशभरात माडग्याळचे नाव गाजत आहे.
आज कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील व्यापारी लोक बकरीईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बकरी ईदच्या कुर्बाणीसाठी बकऱ्यांची खरेदी केली गेली. आज बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसून आली बकऱ्यांना योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. माडग्याळचा बाजार हा शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असून येथे लांबून व्यापारी लोक खरेदीसाठी येत असतात. यामुळे शेतकऱ्यांनाही त्यांच्या बकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे. आजच्या बाजारात डोक्यावर चंद्रकोर असलेले बरीच बोकडे विक्रीसाठी आलेली दिसून आली. काही शेतकऱ्याकडून सदरच्या बोकडांना दोन ते तीन लाख रुपये किमती सांगितल्या जात होत्या. आजचा बाजारात हजारो बकऱ्यांची खरेदी विक्री झाल्याचे दिसून येत आहे. माडग्याळचा बाजार हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भरवला जातो. बाजारात बाजार समितीकडून शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरवणे गरजेचे आहे. मात्र येथे शेतकऱ्यांना सुविधा पुरवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. जनावरासाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.








