ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी (Lakhimpur Kheri Violence) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (ashish mishra) याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आशिष मिश्राचा जामीन रद्द करत न्यायालयाने त्याला पुढील सात दिवसात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
लखीमपूर खेरी येथे काही महिन्यांपूर्वी आशिष मिश्रा याने आपल्या थार गाडीने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडलं होतं. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात आशिष मिश्रा याला जामीन दिला होता. त्यानंतर हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आशिष मिश्रा याला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सुनावणीदरम्यान, शेतकऱयांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांनी उच्च न्यायालयानं चौकशी अहवालाकडे दुर्लक्ष केलं आणि आरोपींना दिलासा देण्यासाठी केवळ एफआयआरचा विचार केला, असा आरोप करत जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
4 एप्रिला या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र, न्यायालयाने त्यावेळी निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने पीडितांची बाजू नीट ऐकून घेण्यात आली नव्हती आणि जामीन देण्यास घाई करण्यात आली, अशी टिप्पण्णी करत आशिष मिश्रा याचा जामीन रद्द केला. तसेच सात दिवसात त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.









