वास्को / पणजी
केंद्र सरकारच्या ‘अमृत सरोवर’ मोहिमेचा एक भाग म्हणून गोव्यातील दुर्लक्षित असे 150 तलाव स्वच्छ आणि पुनऊज्जीवित केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी पत्रकारांना दिली. वास्को येथील मायमोळे तलावाच्या सफाईच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अमृतसरोवर मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर गोव्यातील 75 आणि दक्षिण गोव्यातील 75 तलावांची स्वच्छता केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नैसर्गिक स्त्रोत असून, त्याचा उपयोग आजही गावागावात केला जात आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचे पाणी तलावांनाही भूमीगत मिळत आहे. सध्या तलावांची स्थिती वाईट असली तरी ह्या तलावांना उर्जितावस्था देण्याचे काम सरकार करणार आहे. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीत तलावांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच अमृत सरोवर या मोहिमेद्वारे टप्प्याटप्प्याने तलावांची स्वच्छता करून त्यांना पुनऊज्जीवित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.









