अभाविप च्या मागणीला यश; विद्यार्थ्यांना दिलासा
पणजी प्रतिनिधी
गोवा विद्यापीठाच्या परीक्षा 25 ऐवजी आता 26 एप्रिल पासून सूरू होणार. गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागातर्फे एप्रिल महिन्यापासून सुरू होणारे वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांचे परिक्षा 25 एप्रिल पासून सूरू होत होते. परंतु याच वेळी 24 एप्रिल रोजी गोव्यातील प्रसिद्ध श्री देवी लईराईची शिरगाव जत्रा आहे.या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर गोव्यातर्फे गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक श्री अशोक चोडणकर यांच्याकडे त्या दिवसाचा पेपर पूढे नेण्याची मागणी करणारे निवेदन पत्र सादर केले होते.
लईराई देवीची जत्रा ही गोमंतकातील एक मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येते. या देवीचे गोव्यासह अन्य शेजारील राज्यात मिळून हजारो धोंड भक्तगण आहेत.या जत्रेदरम्यान धोंड गोव्यातील गावोगावी कडकपणे व्रत पाळतात. या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेचा मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. रात्री जे विद्यार्थी धोंड आहेत ते होमखंड मधून आगीच्या कोळशावर चालतात. ही विधी पहाटेपर्यंत चालू असते. त्यामुळे 25 तारखेला सकाळी जे विद्यार्थी धोंड आहेत, त्यांना परीक्षा द्यायला कठीण होणार. पारंपरिक गोव्याच्या संस्कृतीच्या दृष्टीने शिरगाव जत्रा ही खूप महत्त्वाची आहे. परीक्षेमुळे नवीन पिढीला या सांस्कृतिक विरासतीचा विसर लागता यायला नको.
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे ही समस्या मांडली होती. यावर विद्यापीठाने विद्यार्थ्यांची समस्या समजून घेतली व ही मागणी मान्य करून नविन वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 25 तारखेच्या सर्व पेपर पूढे ढकलण्यात आले आहे. अभाविप या विषयावर गोवा विद्यापीठाचे आभारी आहे.









