वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या डीसी खुल्या महिलांच्या हार्डकोर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाची लैला फर्नांडीस तसेच रशियाच्या अॅना कॅलिनस्कायाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना अनुक्रमे रायबाकिना आणि राडुकानू यांचा पराभव केला.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लैला फर्नांडीसने 2022 च्या विम्बल्डन स्पर्धेतील विजेत्या इलेना रायबाकिनाचा 6-7 (2-7), 7-6 (7-3), 7-6 (7-3) अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या फर्नांडीसने या उपांत्य फेरीच्या सामन्यात 12 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. हा उपांत्य फेरीचा सामना 3 तास, 16 मिनिटे चालला होता.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या 26 वर्षीय अॅना कॅलिनस्कायाने इमा राडुकानूचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये केवळ तासभराच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात अॅनाने 14 बॅकहँड विनर्सचे फटके मारले. 2025 च्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील पहिले जेतेपद मिळविण्यासाठी फर्नांडीस इच्छुक आहे. या स्पर्धेत फर्नांडीसने अमेरिकेच्या टॉप सिडेड जेसिका पेगुलाचा पराभव केला होता.









