प्रचारात महिलांचा लक्षणीय सहभाग : आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर /किणये
ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्यासाठी आणि ग्रामीणमध्ये समितीचा भगवा फडकविण्यासाठी रणरागिणी सरसावल्या आहेत. विविध गावांमध्ये होणाऱ्या प्रचारफेरीत समितीच्या कार्यकर्त्यांबरोबरच महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येऊ लागला आहे. कोणतेही आमिष नसतानाही केवळ स्वयंस्फूर्तीने प्रचारफेरीत वाढणारा महिलांचा सहभाग हा ग्रामीणमध्ये विजयाची नांदी ठरविणारा आहे. गेल्या आठवडाभरापासून तालुक्याच्या विविध गावांमध्ये सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये प्रचारफेऱ्या काढून जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांसोबत महिलांही मोठ्या संख्येने सहभागी होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे महिलांनी ग्रामीणमध्ये समितीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचा ठाम निर्धार केला आहे असे वाटते.
रणरागिणींचा मोठा सहभाग
बोकनूर, बेळगुंदी, बेळवट्टी, इनामबडस, बिजगर्णी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, वाघवडे, हलगा, बस्तवाड, कोंडूसकोप, गणेशपूर, सरस्वतीनगर, हंगरगा, मंडोळी, सावगांव आदी गावांमध्ये झालेल्या प्रचारफेऱ्यांमध्ये हातात भगवे ध्वज व डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून रणरागिणी सहभागी होत असल्यामुळे उत्साह निर्माण झाला आहे.
विविध गावांतून पाठिंबा
गेल्या 66 वर्षांपासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. सीमाप्रश्नाचा खटला सध्या अंतिम टप्प्यात आहे. मराठी भाषिकांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी व सीमाप्रश्नाच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी समितीचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना तालुक्याच्या विविध गावांतून पाठिंबा मिळत आहे. प्रचारसभांमध्ये महिला व तालुक्यातील कांही तरुण मुली आपल्या भाषणातून मराठीवर होणाऱ्या अन्यायाबद्दल माहिती देऊ लागल्या आहेत. तसेच मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी समितीला मतदान करा, असेही प्रचारात सहभागी होणाऱ्या महिला सांगत आहेत. या प्रचारामध्ये प्रामुख्याने डॉ. मधुरा गुरव मोटराचे, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, जि. पं. माजी सदस्या प्रेमा मोरे, ता. पं. माजी सदस्या कमल मन्नोळकर, तुळसा पाटील, जि. पं. माजी सदस्या माधुरी हेगडे, मीरा, प्रिती चौगुले, रेखा बामणे, विद्या सरनोबत आदींसह प्रचार करण्यात येत असलेल्या भागातील महिलांचा विशेष सहभाग दिसून येतो आहे.









