पुणे / वार्ताहर :
पुणे विमानतळावर महिला इन्स्पेक्टरची कॉलर पकडून तिला मारहाण करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. गुंजन राजेशकुमार अग्रवाल (वय 24, रा. हावडा, वेस्ट बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत CISF इन्स्पेक्टर रुपाली भिमराव ठोके (39) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन आग्रवाल ही 12 मार्चला रात्री टॅक्सीने विमानतळ परिसरात आली. परंतु तिने टॅक्सी ड्रायव्हरचे पैसे दिले नाही, त्यामुळे तिचे टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद झाले. अखेर टॅक्सी ड्रायव्हरने याबाबत एअरपोर्ट ऍथॉरीटीकडे मदत मागितली. त्यावेळी पुणे विमानतळावरील टर्मीनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी आरोपी गुंजन अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना तरुणीने शिवीगाळ करुन एअरपोर्ट प्रस्थान गेट क्रमांक एक समोरील रांगेत गोंधळ घातला. हा गोंधळ आणि आरडाओरड ऐकून सीआयएसएफ इन्स्पेक्टर रुपाली ठोके या त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी गुंजन हिला शांत करत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तीने त्यांच्याशीच झटापट केली. ठोके यांच्या शासकीय डेसची कॉलर पकडून त्यांना कानाखाली मारली. तसेच त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला चावा घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अखेर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणीस ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या हवाली केले.
अधिक वाचा : महापालिकेची निवडणूक होणार तरी कधी..?
सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत संबंधित तरुणीला अटक करण्यात आली आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस वाकडे अधिक तपास करत आहेत.









