‘सिंदूर अभियान’ चर्चेत राहुल गांधी यांची टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या सध्याच्या सरकारमध्ये इच्छाशक्तीची कमतरता आहे. त्यामुळे सिंदूर अभियान अर्ध्यावरच थांबविण्यात आले आहे. भारताची परराष्ट्र व्यवहार नीती अपयशी ठरली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जगातील एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केली.
‘सिंदूर अभियान’ या विषयावरच्या महाचर्चेत लोकसभेत ते भाषण करत होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपणच शस्त्रसंधी घडवून आणली आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 29 वेळा केले आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम असेल, तर त्यांनी ट्रंप खोटे बोलत आहेत, हे या सदनात स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. ट्रंप यांनी अनेकदा मध्यस्थी केल्याचा दावा केला असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. यातून त्यांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते, अशा अर्थाचे वक्तव्यही त्यांनी केले.
चीन-पाकिस्तान संबंध धोकादायक
पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंध अलिकडच्या काळात वाढत आहेत ही बाब भारतासाठी धोकादायक आहे. ‘सिंदूर अभियाना’च्या काळात पाकिस्तानला उपग्रहीय माहिती चीननेच पुरविली होती. भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक होती. भारताचे धोरण चीन आणि पाकिस्तान या दोघांनाही तोंड देण्याचे असावयास हवे. मात्र, सध्याच्या भारत सरकारची ही स्थिती नाही. त्याचे धोरण अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे, अशीही टीका गांधी यांनी केली आहे.
साध्य काय केले ?
‘सिंदूर अभियान’ घडवून पाकिस्तानला धडा शिकविल्याची भाषा भारत सरकार करीत आहे. तथापि, या अभियानातून नेमके काय साध्य झाले, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे चीनला घाबरतात काय असा प्रश्न आहे. त्यांनी चीनसंबंधी कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर देत नाहीत, याचे कारण काय आहे, अशी खोचक पृच्छाही राहुल गांधी यांनी केली.
अमेरिकेची पर्वा केली नव्हती
1971 मध्ये तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा बांगला देश युद्धात पूर्ण पराभव केला होता. पाकिस्तानच्या 1 लाख सैनिकांनी शरणागती पत्करली होती. त्यावेळी अमेरिका काय म्हणेल याची त्यांनी पर्वा केली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा निर्धार दाखविलेला नाही. त्यांनी शरणागती पत्करुन सिंदूर अभियान थांबविले आहे. ते इंदिरा गांधी यांच्या निम्म्या क्षमतेचे जरी असतील, तरी त्यांनी अमेरिकेचा निषेध करुन दाखवावा. त्यांनी आपली तुलना इंदिरा गांधी यांच्याशी करु नये, असेही प्रतिपादन गांधी यांनी केले.
मुनीर यांच्यासह भोजन
पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे जबाबदार आहेत. पण या मुनीरना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून त्यांच्यासह भोजन केले. याचाच अर्थ भारत आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एकटा पडला आहे, हे स्पष्ट होत आहे. हे देखील भारताच्या परराष्ट्र व्यवहार धोरणाचे अपयश दाखवून देणारेच आहे, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.









