महापालिकेतील अधिकाऱ्यांतून नाराजी : कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अत्यावश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक किंवा सर्वसाधारण बैठकीचा अजेंडा तसेच विषयांची संपूर्ण माहिती तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून दिल्या जात आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे अजेंडा किंवा संपूर्ण माहिती तयार करणे अवघड जात आहे. याबाबत सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रथम कर्मचाऱ्यांची भरती करावी, त्यानंतरच काम करण्यास सांगावे, असे सांगण्यात येत आहे. एकूणच कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिकेचा कारभार चालविणे अवघड जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिकेमध्ये सध्या असलेल्या सत्ताधारी गटाला सर्वसाधारण सभा, याचबरोबर स्थायी समितीच्या बैठका घ्यावयाच्या आहेत. मात्र त्याचा अजेंडा तयार करण्यासाठी संगणकीय विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. यातच हिवाळी अधिवेशनाच्या कामालाही त्या कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष, कौन्सिल सेक्रेटरी व त्या विभागाच्या बैठकीचा अजेंडा, तसेच संपूर्ण माहिती तयार करावी लागत आहे. केवळ अजेंडा तयार करून चालणार नाही तर बैठकीमध्ये येणाऱ्या विषयांची इत्यंभूत माहिती त्यामध्ये दिली पाहिजे, अशी अट नगरसेवक अधिकाऱ्यांना घालत आहेत. एका बैठकीचे जवळपास 25 ते 30 पाने तयार करावी लागतात. त्याला बराच कालावधी लागतो. याचबरोबर मनुष्यबळही लागते. मात्र केवळ काही कर्मचाऱ्यांवर हे काम सुरू आहे.
कोणतीही चूक झाल्यानंतर नगरसेवक संबंधित अधिकारी असो किंवा कर्मचारी असो त्याला धारेवर धरत आहेत. त्यामुळे कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थायी समितीच्या केवळ सात सदस्यांसाठी अजेंडाबरोबर इतर माहिती देणे शक्य आहे. मात्र 58 नगरसेवकांना इतकी माहिती पुरविणे अवघड आहे. त्याला अधिक खर्चही येत आहे. तेव्हा याबाबत आता सभागृहामध्ये चर्चा करूनच निर्णय काढणे गरजेचे झाल्याचे दिसून येत आहे. एकूणच स्थायी समिती असो किंवा सर्वसाधारण सभेचा अजेंडा असो त्यांच्याबरोबर संपूर्ण माहिती देण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांतून होत आहे.









