1652 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत : सेविकांना स्वत:च्या इमारतीची स्वप्ने
बेळगाव : शासकीय अनुदान आणि जागेच्या अभावामुळे जिल्ह्यात सुमारे 1652 अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतीत सुरू आहेत. नवीन अंगणवाडी बांधकामासाठी जागा मिळत नसल्याने भाड्याच्या इमारतीसाठी दरमहा लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. परिणामी खात्यावर अधिक बोजा पडू लागला आहे. शिवाय स्वत:च्या इमारतीचे स्वप्न पूर्ण कधी होणार, अशी आशाही अंगणवाडी सेविकांना होत आहे.
जिल्ह्यात 5,545 अंगणवाडी केंद्रांपैकी 3893 केंद्रांना स्वत:च्या इमारती नाहीत. तर 1652 केंद्रे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. एका बेळगाव शहरात तब्बल 323 अंगणवाडी केंद्रे भाडोत्री आहेत. त्यामुळे इमारतीच्या भाड्यासाठी दरमहा 20 लाख रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागात ग्राम पंचायत, समुदाय भवन, युवक मंडळ, शाळा आवारात अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. महानगर व्याप्तीतील भाडोत्री अंगणवाड्यांना 6 हजार, शहर भागात 4 हजार तर ग्राम पंचायत व्याप्तीतील अंगणवाड्यांना 1 हजार भाडे निश्चित करण्यात आले आहे. शहरात 353 अंगणवाडी केंद्रांपैकी 323 अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतीत आहेत. या इमारतींसाठी प्रत्येक महिन्याला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 6 हजार रुपये भाडे दिले जाते. जिल्ह्यात भाडोत्री अंगणवाड्यांची संख्या अधिक असल्याने खात्याच्या तिजोरीवर भार वाढू लागला आहे. मात्र, जागा मिळत नसल्याने वर्षानुवर्षे अंगणवाड्या खासगी इमारतीतच सुरू असल्याचे दिसत आहे. महिला व बाल विकास खात्याकडे जागेचा अभाव आहे. जागा असल्यास इमारत बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात जागा उपलब्ध आहेत, मात्र शहरात जागा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नवीन अंगणवाडी बांधकाम इमारतीचा प्रश्न कायम आहे. खाते आणि अंगणवाडी सेविका स्वत:च्या इमारतीची स्वप्ने पाहात असले तरी जागा मिळत नसल्याने स्वप्न अधुरे राहू लागले आहे.
650 अंगणवाडी केंद्रांसाठी जागा उपलब्ध…
जिल्ह्यात 1200 हून अधिक अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतीत सुरू आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात भाडोत्री इमारतींची संख्या अधिक आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 650 अंगणवाडी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय यशोदीप अंतर्गत अंगणवाडी केंद्रांची दुरुस्ती केली जात आहे.
नागराज आर. महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक









