190 कोटी खर्चूनही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी : भविष्यात मोठा धोका संभव
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानक स्मार्ट झाले. परंतु, सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावर कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे कोणीही व्यक्ती रेल्वेस्थानकात जाते व येते. परंतु, याची माहिती सुरक्षा यंत्रणांना नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकासाठी 190 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एखाद्या विमानतळ टर्मिनलप्रमाणे संपूर्ण स्वरूप देण्यात आले. बेळगावमधून दररोज हजारो प्रवासी उत्तर व दक्षिण भारतात प्रवास करतात. दिवसाकाठी 18 ते 20 एक्स्प्रेस बेळगाव रेल्वेस्थानकामधून धावत असतात. आरक्षित तिकीट असलेले दोन ते तीन हजार प्रवासी तर अनारक्षित एक्स्प्रेसचे चार ते पाच हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईकही रेल्वेस्थानकावर येत असतात.
महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर रेल्वे पोलीस, तसेच आरपीएफ जवानांकडून विशेष सुरक्षा दिली जाते. परंतु, बेळगाव रेल्वेस्थानकावर सुरक्षेचा अभाव दिसून येतो. प्लॅटफॉर्म तिकीट न काढताच अनेकजण प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याचेही दिसून येतात. महिन्यातून एखादी तपासणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होते. परंतु, प्रवाशांची संख्या मोठी असतानाही सुरक्षेबाबत ढिलाई का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगाव हे शहर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे बऱ्याचवेळा गुन्हेगार आश्रयासाठी शहरात येत असतात. हे अनेक गुन्ह्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर त्या मानाने सुरक्षा यंत्रणा कार्यरत राहणे गरजेचे आहे. मेटल डिटेक्टर कायम सुरू ठेवावेत, तसेच अधिकाऱ्यांची सीसीटीव्हीवर नजर राहणे आवश्यक आहे. परंतु, या सुविधांचा अभाव असल्याने रेल्वे विभाग प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहे का? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
युवकाकडून फॅक्ट चेक
रेल्वेस्थानकातील सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी बेळगावमधील एका युवकाने फॅक्ट चेक करून पाहिला. एक रिकामी बॅग घेऊन तो युवक रेल्वेस्थानकात दाखल झाला. त्यानंतर ती बॅग त्याने प्लॅटफॉर्म क्र. 1 वर ठेवली आणि तेथून तो बाहेर पडला. बराचवेळ कोणीही त्या बॅगची दखल घेतली नाही. पोलीस तिकडे फिरकलेही नाहीत. जर एखादे जीवघेणे कृत्य करण्याचा इरादा असेल तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या घटनेमुळे रेल्वेस्थानकातील यंत्रणेमध्ये किती ढिलाई आहे, हे समोर आले.









