वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची रिमझिम होऊ लागली आहे. बुधवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या कालावधीत पावसाची उघडीप शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. दमदार पाऊस नाही यामुळे आता शिवारातील पेरणी, विविध पिकांची लागवड करायची कशी, याची चिंता शेतकऱ्यांना लागू राहिली आहे. दि. 23 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राच्या पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे खरिपाचे उद्दिष्ट साधायचे कसे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे सध्या ढगाळ वातावरण असूनही दमदार पाऊस नाही. यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.
रताळी बांध तयार पण…
चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शिवारामध्ये भातपेरणी करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी माळरानावर रताळी मेरा (बांध) तयार करून ठेवल्या आहेत. ही रताळी लागवड करण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
…तर रताळी लागवडीला येणार जोर
तालुक्यात आतापर्यंत केवळ 20 टक्के इतकीच पेरणी झाली आहे. अद्याप 80 टक्के भातपेरणी शिल्लक आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, पाऊस झाल्यास रताळी वेललागवड करणे, बटाटा लागवड आदी कामांना जोर येणार आहे. अद्याप तरी तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यामुळे आता साऱ्यांच्या नजरा केवळ आभाळाकडे लागून राहिलेल्या आहेत.









