नागरिक, पादचारी, प्रवाशांची गैरसोय : नवीन शौचालयांची गरज, मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरात सार्वजनिक शौचालयांची कमतरता असल्याने नागरिक, पादचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी शौचालय नसल्याने नागरिकांची कुचंबणा होऊ लागली आहे. गैरसोय टाळण्यासाठी मनपा प्रशासन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहराचा विस्तार वाढू लागला आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र शहरात असलेली सार्वजनिक शौचालये कमी पडू लागली आहेत. शिवाय या ठिकाणी स्वच्छतेचा अभावदेखील आहे. त्यामुळे शहरातील शौचालयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणीच शौचालयांचा अभाव असल्याने समस्या निर्माण होत आहेत. परिणामी मिळेल त्या ठिकाणी मूत्रविसर्जन केले जात असल्याने अस्वच्छता होऊ लागली आहे.
देखभालीविना शौचालये पडून
रविवारपेठ, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, जुना पीबी रोड, कॉलेजरोड, रामदेव हॉटेल, पहिला, दुसरा रेल्वे गेट, उद्यमबाग परिसर, न्यायालय आवार आदी ठिकाणी शौचालयांचा अभाव आहे. त्यामुळे परिसरात येणाऱ्या नागरिकांना फिरावे लागत आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण होताना दिसत आहे. मनपाने शहरात काही ठिकाणी ई टॉयलेट संकल्पना राबवून शौचालय उभारले आहेत. मात्र ही शौचालये देखील देखभालीविना पडून आहेत. त्यामुळे गैरसोयीत भर पडली आहे.
बसथांबे, वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारा
मुख्य बाजारपेठेत शौचालयांचा अभाव असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौकसह आरपीडी कॉर्नर, गोगटे सर्कल आदी ठिकाणी शौचालयाची गरज आहे. काही बसथांब्याजवळ शौचालये नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. प्रवाशांना शौचालयांसाठी बरीच पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे महिला, वयोवृद्ध व बालकांची कुचंबणा होत आहे. विशेषत: प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे बसथांबे वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी शौचालये उभारावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होऊ लागली आहे.
शौचालय देखभालीकडे दुर्लक्ष
शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालयात पाण्याचा अभाव असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे नागरिक शौचालयात जाणे टाळू लागले आहेत. सार्वजनिक शौचालयांची देखभाल करून स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे.









