तालुक्यात 205 जागा मंजूर, मात्र 26 अतिथी शिक्षकांच्या जागा रिक्त : शिक्षण खात्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयात 358 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. सदर जागा भरण्यासाठी राज्य शिक्षण खात्याकडून कोणतीच इच्छाशक्ती नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून गेल्या आठ-दहा वर्षांपासून अतिथी शिक्षकांवर कार्यभार चालवला जात आहे. पण अतिथी शिक्षकांना अपेक्षित गौरवधन व त्यांच्या सेवेची कायमस्वरुपी दखल घेतली जात नसल्याने डी.एड्. पदवीधर शिक्षकांनीही याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्मयात 205 अतिथी शिक्षकांच्या जागा मंजूर होऊनही अद्याप 26 ठिकाणी अतिथी शिक्षकच मिळत नसल्याने शिक्षण विभागाची बरीच गोची झाली आहे. त्यामुळे अतिथी शिक्षक मिळेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
खानापूर तालुक्मयाच्या दुर्गम व मध्य भागामध्ये अनेक शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या आहे. एकेरी शिक्षकांवर अनेक शाळा अवलंबून आहेत. बऱयाच ठिकाणी मराठी शाळांमध्ये कन्नड शिक्षकांवर जबाबदारी देऊन शाळा चालवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची गोची होत आहे. प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्यानिहाय अतिथी शिक्षक व कायमस्वरुपी शिक्षक मिळावेत यासाठी संबंधित गावातील पालकांची मागणी आहे. पण ही इच्छा पुरविण्यातही शिक्षण खाते असफल ठरले आहे.
अल्पशा गौरवधनामुळे शिक्षकांची पाठ
खानापूर तालुक्मयात यावषी 205 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत. पण अल्पशा गौरवधनामुळे अनेक पदवीधर शिक्षकांनी याकडे पाठ फिरविली आहे. बऱयाच शाळांच्या विभागात डी. एड्. पदवीधारक नसल्याने अतिथी शिक्षकांची जागा मंजूर होऊनही अनेक शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. यासाठी शिक्षण खात्याने पर्यायी व्यवस्था करून या शाळांमध्ये शिक्षकांची पूर्तता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खानापूर तालुक्मयात मंजूर झालेल्या 205 शाळांपैकी 26 शाळांमध्ये अद्याप अतिथी शिक्षक नेमणूक झालेले नाहीत. यामध्ये जांबोटी व लोंढा या दुर्गम भागातील अनेक मराठी शाळा आहेत. यापैकी मोहिशेत-गवळीवाडा, मुडगई, गवसे, कालमणी, हब्बनहट्टी, गोल्याळी, बेटगेरी, कुसमळी, चोर्ला, गवाळी, पास्टोळी, सायाचे माळ, देगांव, नागरगाळी, बामणकोप, हुळंद, गोधोळी येथील मराठी शाळांमध्ये मराठी अतिथी शिक्षक मिळाले नाहीत. खानापूर शहरातील कन्नड सरकारी शाळा, खानापूर उर्दू शाळा, पारिश्वाड उर्दू शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरती झाली नाही.
शिक्षक भरती प्रक्रियेतील जाचक नियम बदलावेत
गेल्या सात-आठ वर्षांपासून अतिथी शिक्षक भरती प्रक्रियेवर शाळांचा कारभार चालत आहे. शिक्षक भरतीसाठी शिक्षण खात्याकडून केवळ प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित शिक्षक भरती होत नसल्याने दिवसेंदिवस सेवानिवृत्ती अथवा बढती झालेल्या शिक्षकांच्या जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे तालुक्मयातील शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी अतिथी शिक्षक निवड प्रक्रिया हाती घेऊन शाळा चालवल्या जात आहेत. पण त्याही ठिकाणी अतिथी शिक्षक मिळत नाहीत. यासाठी शिक्षक भरती प्रक्रियेत असणारे जाचक नियम बदलून भरती प्रक्रिया हाती घेणे गरजेचे आहे.









