इमारतीला अनेक ठिकाणी गळती : कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक : स्वच्छतेकडे दुर्लक्ष
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या बहुतांश सरकारी कार्यालयांचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र, बेळगाव तालुक्याचे तहसीलदार कार्यालय अद्यापही जुन्या इमारतीमध्येच आहे. तालुक्याच्या महसूल कार्यालयाचा विकास रखडल्याने कर्मचाऱ्यांना गळक्या इमारतीमध्येच काम करावे लागत आहे. येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही येथील अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कार्यालयाचा कायापालट कधी केला जाणार, याची प्रतीक्षा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे. सरकारी कार्यालये पेपरलेस करण्याच्या उद्देशाने सरकारकडून बहुतांश सरकारी कार्यालयांचा कायापालट करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आसन व्यवस्था, कागदपत्रे ठेवण्यासाठी सोय तसेच संगणक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांना संगणकावरच काम करावे लागते. त्यामुळे काम सुरळीत होण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्याचा कारभार चालणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असले तरी जुन्या इमारतीमध्ये अनेक गैरसोयी असल्याने कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. तहसीलदार कार्यालयाचा कारभार कचेरी रोडवरील जुन्या इमारतीतून व रिसालदार गल्ली येथील महापालिकेच्या जुन्या इमारतीमधून चालतो. कचेरी रोडवरील तहसीलदार कार्यालयाची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने तहसीलदार कार्यालय रिसालदार गल्ली येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. कचेरी रोडवरील तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीमध्ये जुने
रेकॉर्ड व भूमी विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी नागरिकांना आरटीसी उतारे तसेच विविध प्रकारची शासकीय प्रमाणपत्रे देण्याची सोय करून देण्यात आली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठीही तहसीलदार कार्यालयात सोय आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे विविध कामानिमित्त सदर कार्यालयात नागरिकांची कायम वर्दळ असते. सध्या पाऊस सुरू असल्याने इमारतीला ठिकठिकाणी गळती लागून कार्यालयात पाणी साचत आहे. कर्मचाऱ्यांना अशा वातावरणातच काम करावे लागत आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांनाही साचलेल्या पाण्यामध्येच थांबावे लागत आहे. कार्यालयात अनेक जुन्या वस्तू, निवडणूक पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील वातावरण अधिक गलिच्छ बनले आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस कचऱ्याचे ढीग अनेक दिवसांपासून तसेच पडून असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. सदर कार्यालयात सुविधांची वानवा असून गैर सुविधांमध्येच काम करावे लागत आहे. इमारतीसाठी मुबलक प्रमाणात जागा असूनही विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गैरसोय झाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांतून करण्यात येत आहे.
मिनी विधानसौध प्रस्ताव प्रलंबित
कचेरी रोडवरील तहसीलदार कार्यालयाची जवळपास एक एकरपेक्षा अधिक जागा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी मिनी विधानसौध बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, यावर अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









