शेतकरी-कुली कामगारांची गैरसोय : सरकारने लक्ष देण्याची गरज : 21 बाजारपेठांना जागेची समस्या
बेळगाव : शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना (एपीएमसी) जागा, कर्मचाऱ्यांची कमतरता यासह मूलभूत सुविधा नसल्याने शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांचीही मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये एपीएमसीच्या 11 मुख्य बाजारपेठा व 35 उपबाजारपेठा आहेत. बेळगाव, बैलहोंगल, सौंदत्ती, यरगट्टी, गोकाक, रामदुर्ग, संकेश्वर, निपाणी, अथणी, कुडची, नंदगडमध्ये मुख्य बाजारपेठ आहेत. या बाजारपेठांच्या व्याप्तीमध्ये उपबाजारपेठा कार्यरत असून यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपबाजारपेठांना सुविधा मिळालेल्या नाहीत. सकाळी व्यापार करून बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर वसूल करणे एवढेच या बाजारपेठांचे काम ठरले आहे, अशी टीका होताना दिसते.
जागेची कमतरता
निपाणी, कुडची व नंदगड एपीएमसींना स्वत:ची जागा नाही. तात्पुरत्या जागेवर बाजारपेठा चालविण्यात येतात. त्याचबरोबर रायबाग, कंकणवाडी, खानापूर, बिडी, चिकोडी, एकसंबा, हुलकुंद, अंकली, घटप्रभा, एम. के. हुबळी, बेळवडी यासह 23 उपबाजारपेठांना अनेक वर्षांपासून जागेची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या बाजारपेठा विस्तृत जागेत स्थलांतर न होता तात्पुरत्या जागेतच सुरू आहेत. परिणामी उत्पन्नाचे स्रोत कमी होत आहेत. बेळगाव, बैलहोंगल, मुडलगी, यादवाड, अथणी, सौंदत्ती यासह बहुतांशी प्रमुख बाजारपेठा बेळगाव जिल्ह्यात आहेत. या बाजारपेठांमध्ये शेजारील जिल्ह्यातील शेतकरी त्याचबरोबर महाराष्ट्र, गोवा राज्यातून शेतकरी व्यापारासाठी येत असतात.
मात्र, येथे मूलभूत सुविधांची वानवा असल्याने गैरसोय होत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी, वाहतुकीसाठी चांगले रस्ते, गटारी, यासारख्या प्रमुख सुविधा येथे नाहीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना थांबण्यासाठीही जागा नाही, अशी तक्रार आहे. शेतकऱ्यांसाठी एपीएमसीमध्ये उभारण्यात आलेल्या रयत भवनमध्येही समस्या आहेत. त्यामुळे त्यांचा वापर होत नाही. अशा ठिकाणी शेतकरी विश्रांतीसाठी झाडे, इमारतींच्या जागा शोधतात. दर्जेदार उपाहारगृहांची व्यवस्था नाही. दररोज शेकडो वाहनचालक, त्यांचे साहाय्यक, कुली कामगार बाजारपेठेत येत असतात. बाजारपेठातील गैरसोयींचा त्यांना नेहमीच सामना करावा लागतो. काही बाजारपेठांमध्ये धान्यसंग्रह करण्यासाठी असलेल्या गोदामांमध्ये गळती लागली आहे. पावसाळ्यात गोदामामध्ये पाणी थांबून धान्याचे नुकसान होते, अशीही काही शेतकऱ्यांची तक्रार आहे. सरकारने बाजारपेठांच्या सुधारणेकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.









