शौचालय, सुरक्षा रक्षक, स्वच्छता नसल्याने पर्यटकांची गैरसोय : मद्यधुंद पर्यटकांमुळे परिसरात अस्वच्छता
बेळगाव : जुलै अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेषत: आजूबाजूला असलेले सर्व धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मात्र, धबधबास्थळी प्राथमिक सुविधा नसल्याने पर्यटकांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. बेळगावपासून जवळ असलेल्या गोकाक, गोडचिनमलकी, हिडकल, आंबोली, सुंडी, किटवाड, तिलारी, बाबा फॉल्स, पारगड, स्वप्नवेल आदी धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मात्र, पर्यटनस्थळी शौचालय आणि स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने गैरसोय होऊ लागली आहे. आंबोली आणि इतर ठिकाणी पर्यटकांकडून पैशाची आकारणी केली जात आहे. मात्र, पर्यटकांना सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कुटुंबासह पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर तरुण-तरुणीदेखील वर्षापर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. मात्र, त्याठिकाणी शौचालये आणि इतर सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
शौचालयांचा अभाव
गोकाक, गोडचिनमलकी, आंबोली, सुंडी आदी ठिकाणी शौचालये नसल्याने पर्यटकांची कुचंबना होत आहे. या धबधब्यांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतून भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
इतर पर्यटकांना इजा पोहोचण्याची भीती
धबधब्यांच्या ठिकाणी मद्य ढोसून बाटल्या, प्लास्टिक, इतर खाद्यपदार्थ जागीच टाकले जात आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊ लागली आहे. विशेषत: मद्यधुंद अवस्थेत बाटल्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे इतर पर्यटकांना इजा पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुरक्षा रक्षकांअभावी हुल्लडबाजी
धबधब्यांच्या ठिकाणी अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रमाण वाढले आहे. अतिपाण्याच्या ठिकाणी जाणे, काठावर जाऊन फोटो काढणे, स्टंटबाजी करणे, मोठ्या आवाजात ओरडणे आदी प्रकार वाढले आहेत. धबधबास्थळी सुरक्षा रक्षक नसल्याने हे प्रकार पहावयास मिळत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.









