छताची बांधणी अपूर्ण तर विश्रामगृह कुलूपबंद : नवीन एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर
बेळगाव : कोट्यावधी रुपये खर्च करून बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. बाहेरून भव्यदिव्य इमारत दृष्टीस पडत असली तरी रेल्वेस्थानकाच्या आत मात्र सुविधांची वानवा आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बेळगावचे माजी खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून अंदाजे 200 कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले. उद्घाटन होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप चौथ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर छत घालण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांना ऊन-पावसाचा सामना करत रेल्वेची वाट पाहावी लागते. या प्लॅटफॉर्मवर फूट ओव्हरब्रिजची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचबरोबर रेल्वेच्या स्वच्छतेसाठी बेळगावमध्ये पीटलाईनची व्यवस्था करण्यात आली. बेळगावमधून इतर शहरांना रेल्वे सुरू होण्यासाठी पीटलाईन महत्त्वाची आहे. सध्या बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-म्हैसूर व बेळगाव-मनुगुरू या एक्स्प्रेस बेळगावमधून सुरू आहेत. परंतु, पीटलाईनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे नवीन एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर होत आहे.
सुविधांसाठी अधिकाऱ्यांशी संवाद…
बेळगावच्या नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वेस्थानकात काही सुविधांचा अभाव असल्याचे प्रवाशांनी सांगितले. याबाबत नैत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे.
-इराण्णा कडाडी(राज्यसभा सदस्य)









