पुणे / प्रतिनिधी :
देशात चीनच्या आर्थिक, परराष्ट्र, व्यापार आणि संरक्षणविषयक धोरणांचे विश्लेषण करू शकतील, अशा तज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे चीनविषयक विश्वासार्ह माहिती आपल्याला मिळत नाही. चीनच्या धोरणांचे योग्य विश्लेषण होत नाही, अशी खंत माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण (Shyam Saran) यांनी व्यक्त केली.
श्याम सरण लिखित ‘हाऊ चायना सीज इंडिया ऍण्ड द वर्ल्ड’ या पुस्तकावर पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात शाम सरण म्हणाले, आपल्याकडे चीनच्या धोरणांचे विश्लेषण करणाऱया तज्ञांची मोठी कमतरता आहे. चीन स्वत:ला जागतिक राजकारण, अर्थकारणाचा केंद्रबिंदू समजतो. मात्र, आज तरी असे चित्र नाही. युरोप, अमेरिकेने 400 ते 500 वर्षे अविरत काम करून हे स्थान मिळविले आहे. चीनला हे स्थान 30-30 वर्षांत मिळविता येणार नाही. चीनमधील हुकूमशाही, चीनमधील तरुणांची संख्या आणि त्यांचे विचार आणि खासगी क्षेत्राचे अर्थकारणात वाढते योगदान पाहता चिनी राजकर्त्यांना चीनमध्ये हुकूमशाहीने कारभार करताना मर्यादा येत आहेत. चिनी लोकांची जीवनशैली वेगळी असल्यामुळे चीन जगाच्या अन्य देशांशी सहजपणे जुळवून घेऊ शकत नाही. चीनच्या ‘बेल्ट आणि रोड एनिशिएटीव्ह’ला युरोप, मध्य आशियात बऱयापैकी यश मिळाले आहे, तितके यश दक्षिण आशियात मिळालेले नाही. या साखळीतील श्रीलंका हा महत्त्वाचा दुवा आता फारच कुमकुवत झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी सीईओ रवी नारायण यांना ईडीकडून अटक
भारताच्या विविधतेविषयी चीनला आकस
भारतात धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक विविधता असूनही भारत एकसंध कसा आहे, असा प्रश्न चिनी विचारवंताना कायम पडतो. विविधता असूनही भारत वेगाने विकास कसा करू शकतो, या बाबत चिनी तज्ञ आश्चर्य व्यक्त करतात. मात्र, भारताची हीच विविधता देशाची, लोकशाहीच्या यशाची आणि आर्थिक विकासामागील खरी ताकद आहे. ती आपण जपली पाहिजे. भारत आक्रमक नाही, असे आपण म्हणतो. पण, चौल, पंडय़ा राजघराण्यांचा इतिहास पाहिल्यास आपण किती आक्रमक होतो आणि आपल्या सत्तेचा किती दूरवर विस्तार केला होता. हे दिसून येते. आक्रमकपणे धोरणे राबविण्यासाठी विविध प्रकारची सक्षमता लागते, असेही सरण यांनी नमूद केले.