केएलईमध्ये राष्ट्रीय अवयव दान दिन : समाजात जागृतीची गरज : पोलीस दल सदैव सहकार्याला तयार
बेळगाव : ग्रामीण भागात अवयवदानाविषयी जागृतीचा अभाव आहे. याबरोबरच अवयवदान घेण्याचे किंवा देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अवयव रोपणाविना अनेक जण वेदनादायी जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर यासंबंधी जास्तीत जास्त जागृतीची गरज आहे, असे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र येथे राष्ट्रीय अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. अवयवदानाच्या चळवळीत आता अनेकांचे साहाय्य, सहकार्य लाभते आहे. मात्र, ही चळवळ आणखी तीव्र करण्याची गरज आहे. खासकरून ग्रामीण भागात जागृती करण्याची गरज आहे. 1975 मध्ये जगात अवयव रोपणाला सुरुवात झाली. आता यामध्ये बदल झाले आहेत. याकामी पोलीस दल सदैव सहकार्याला तयार असते. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयव वाहतुकीसाठी आम्ही सहकार्य करतो.
सर्व अडथळे दूर करा
वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद म्हणाले, राज्यात अनेक वैद्यकीय महाविद्यालये असूनही अवयव रोपणात अपेक्षित प्रगती दिसून येत नाही. जगात सर्वाधिक अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया अमेरिकेत होतात. भारतात याचे प्रमाण कमी आहे. मेडिको लिगल प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. सर्व अडथळे दूर करून अवयव रोपणासाठी अनुकूल करून द्यावे. इस्पितळाचे क्लिनिकल संचालक डॉ. आर. बी. नेर्ली म्हणाले, अवयव दान व रोपण सर्वात आधी आपल्याच देशात झाले आहे. पुराणग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे, यावेळी अॅड. नयना नेर्ली यांनी ‘अवयव दान व कायदे’ याविषयी माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजेश पवार, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. राजशेखर सोमनट्टी आदी उपस्थित होते.
मूत्रपिंड दान केलेल्यांचा सत्कार
मूत्रपिंड दान करून पतीला जीवदान देणाऱ्या रेणुका जरली यांनी अवयव दान व त्याविषयीच्या अंधश्रद्धा यासंबंधी आपले अनुभव सांगितले. केवळ पैशाने अवयवांचे मोल करता येणार नाही. आपल्या पतीचे मूत्रपिंड निकामी झाले, त्यावेळी आम्हाला खूप त्रास सोसावा लागला. शेवटी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या सल्ल्यावरून मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. आज आम्ही दोघेही उत्तम जीवन जगत आहोत, असे त्यांनी आपले अनुभव सांगितले. यावेळी आपल्या मुलाला मूत्रपिंड दान केलेल्या यल्लुबाई आंबोलकर व पतीसाठी मूत्रपिंड दान केलेल्या निलम आडके यांचा सत्कार केला.









