डॉ. पुष्कर मिश्रा यांचे प्रतिपादन, वाय. के. प्रभू-आजगांवकर व्याख्यानात मांडले विचार
प्रतिनिधी/बेळगाव: संस्कारांची कमतरता असल्यामुळे सध्याच समाज भरकटत आहे. याचा परिणाम सध्याच्या जीवनशैलीवर होताना दिसतो. पर्यावरणचा ऱ्हास झाल्याने वातावरणात आमुलाग्र बदल होत आहेत. एकीकडे देश परस्परांमध्ये शांतीचे संदेश देत असतानाच दुसरीकडे मात्र बायोलॉजिकल व केमिकल शस्त्रास्त्रे तयार होत आहेत. जातीय दहशतवादहि टोकाला पोहोचला आहे. माणसातील संवेदनशीलता कमी होत असून माणुसकी आटत चालली असल्याचे मत आश्रम परंपरा या संस्थेचे संस्थापक डॉ. पुष्कर मिश्रा यांनी व्यक्त केले.
एसकेई सोसायटी आयोजित व तरुण भारत ट्रस्ट पुरस्कृत डॉ. वाय. के. प्रभू-आजगावकर मेमोरियल व्याख्यान मंगळवारी के. एम. गिरी सभागृहात पार पडले. या व्याख्यानात डॉ. पुष्कर मिश्रा यांनी ‘आश्रम परंपरा व विश्व समाज’ या विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कर्नाटक सरकारच्या दिल्ली येथील माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर, सेक्रेटरी मधुकर सामंत, सदस्या माधुरी शानभाग उपस्थित होत्या.
मिश्रा म्हणाले, ज्या ठिकाणी ज्ञानार्जनाचे काम होते त्या ठिकाणाला आश्रम असे समजले जाते. प्रत्येक घर एक आश्रम झाले पाहिजे. धर्म म्हणजे एक विशिष्ट समाज नसून उपासना करण्याची पद्धत आहे. आचार-विचारातून धर्म समजून येत असतो. त्यामुळे धर्माला एका चौकटीत बांधणे तसे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शंकरगौडा पाटील यांनी सध्याच्या कुटुंब पद्धतीचा आढावा घेत कुटुंबामध्ये संस्कार किती महत्वाचे आहे, हे उदाहरणासह स्पष्ट केले. आश्रम जीवनपद्धती अवलंबविल्यास प्रत्येक घरात संस्कारक्षम पिढी तयार होईल, असे त्यांनी सांगितले. किरण ठाकुर म्हणाले, निराशेतtन आशावाद निर्माण झाला पाहिजे. आपल्या देशांने जगाला आश्रम पद्धती दिली. या पद्धतीवरच आज जगभरात संशोधन सुरू आहे. केवळ सुशिक्षित पिढी घडवून चालणार नाही, तर संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. लता लक्ष्मीश्वर यांच्या स्वागत गीताने झाली. प्राचार्य बी. एल. मजकूर यांनी स्वागत केले. डॉ. नितू तिवारी व अभय सामंत यांनी परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते कै. डॉ. वाय. के. प्रभू -आजगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









