शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
कचेरी रोड येथील जुन्या तहसीलदार कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेअभावी कार्यालयाची दुर्दशा झाली आहे. शासकीय कागदपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
तहसीलदार कार्यालयात जात उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्व, सातबारा, नॉनक्रिमिलेअर, जनसंख्या प्रमाणपत्र, मरण उतारा आदी कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शौचालयाची दुर्दशा झाली आहे. शिवाय आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयाअभावी विशेषत: महिलावर्गाची कुचंबणा होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शौचालयाच्या आवारात कचरा, प्लास्टिक व घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरत आहे. याच ठिकाणी शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उपतहसीलदार कार्यालय, भू-विकास विभाग, नाड कचेरी व इतर ठिकाणी सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे परिसर गजबजलेला असतो. मात्र नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.









