विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर : शिक्षण खाते सुस्त : शाळा सुधारणा समिती, अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
बेळगाव : सरकारी शाळांमध्ये शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. शाळेत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकडे शाळा सुधारणा समिती, शिक्षक आणि अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6 हजार 450 हून अधिक प्राथमिक, माध्यमिक अनेक कॉलेज आहेत. मात्र या सरकारी शाळांमध्ये शुद्ध पाणी मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षणप्रेमी आणि पालकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सुमारे 4.50 लाखांहून अधिक विद्यार्थी विविध वर्गांमध्ये शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
यंदा पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खाली गेली आहे. त्यामुळे विहीर आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे शाळास्तरावर देखील पाण्याचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याअभावी रहावे लागत आहे. काही शाळांमध्ये कूपनलिका आहेत. मात्र जलशुद्धीकरण केंद्रे नाहीत. त्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. काही शाळांना सेवाभावी संस्थांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. तर काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रेही बसविण्यात आली आहेत. त्यामुळे काही शाळांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मात्र काही शाळांची परिस्थिती गंभीर आहे. अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी शाळेतील शुद्ध पाण्याबाबत गांभीर्य घेत नसल्याचेही दिसत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
…तर कारवाई करणार
सरकारी शाळांना आवश्यक सोयी, सुविधा बरोबर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. याबाबत दुर्लक्ष झाल्यास बीईओ, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई केली जाईल. शाळांना सुविधांबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा.
-हर्षल भोयर-जिल्हा पंचायत सीईओ









