काही पंचायतींमध्ये अभाव, काणकोण पालिका क्षेत्रात समस्या जास्त उग्र, पैंगीण स्मशानभूमीचा आधार घेण्याची वा मडगावला धाव घेण्याची पाळी
काणकोण : एखाद्या व्यक्तीला मृत्यू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता यायला हवेत. मात्र काही भागांत मृत्यूनंतर स्मशानभूमीच्या अभावी होणारी मृतदेहाची परवड अगदी लांच्छनास्पद अशी असून गोवा मुक्तीला 60 वर्षे झाली, तरी काणकोणसारख्या भागात आजही स्मशानभूमीची समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. कचरा मुक्तीसाठी प्रत्येक पंचायत, नगरपालिका प्रयत्नशील असून राज्य, केंद्रस्तरावर त्यांनी यासाठी पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. मात्र त्यातील काही पंचायती आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये स्मशानभूमीची योग्य सोय नसल्यामुळे काही वेळा आगोंदच्या लोकांना पैंगीणच्या स्मशानभूमीचा, तर पालिका क्षेत्रातील लोकांना पैंगीणबरोबरच प्रसंगी मडगावच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत आहे. असे असताना या पंचायतींचे पंच, सरपंच व पालिकेची जबाबदारी सांभाळणारे नगराध्यक्ष, नगरसेवक जणू काहीच अडचणी नाहीत अशा आर्विभावात वागत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
नगर्से स्मशानभूमीची दयनीय अवस्था
1961 साली गोवा मुक्त झाला. त्यापूर्वी ‘कोंसेल द कानाकोना’च्या अंतर्गत ‘काम्र द कानाकोना’खाली सर्व प्रशासकीय कारभार चालू होता. गोवा मुक्तीनंतर 1973 साली काणकोण पालिका अस्तित्वात आली. चार रस्ता ते शेळेरपर्यंतच्या अवघ्या 1000 ते 1200 मतदारांपुरत्या मर्यादित असलेल्या या पालिकेच्या चार रस्ता, नगर्से, चावडी, शेळेर आदी प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत महेंद्र भाटीकर, भिको काणकोणकर, गोपाळ बाळे, राया खोलकर, शशिकांत गावकर आणि श्रीमती गणे हे नगरसेवक निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीत शिरेवाडा, नगर्से येथील स्मशानभूमीची उभारणी करण्यात आली. पण आज या स्मशानभूमीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.
या स्मशानभूमीच्या जागेची मालकी नेमकी कोणाकडे आहे त्याचा दस्तऐवज पालिकेकडे नाही. काणकोण कोमुनिदाद, वन खात्याने या जागेसंबंधी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी 50 हजार रु. खर्च करून पालिका संचालनालयाने या स्मशानभूमीची उभारणी केली होती. या स्मशानभूमीत हत्तीपावल येथून लाकडे आणली जायची. त्यानंतर पालिका संचालनालयाच्या निधीतून दगडी कुंपण बांधण्यात आले. मात्र पालिका निधीतून या स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी एकही पैसा खर्च करण्यात आला नाही. या ठिकाणी सार्वजनिक नळाची व्यवस्था करण्यात आली होती. लोकांना उभे राहायला जागेची सोय करण्यात आली होती. लाकडे ठेवायला जागा तयार करण्यात आली होते आणि या ठिकाणी नीट अंत्यसंस्कार केले जायचे. नगर्से येथील स्व. पुरुषोत्तम देसाई सर्व व्यवस्था सांभाळायचे, अशी माहिती जवळजवळ 32 वर्षे काणकोण पालिकेत विविध पदांवर काम केलेल्या जयंत राजाध्यक्ष यांनी दिली.
स्मशानभूमीच्या परिसरात उभी राहत आहेत घरे
या स्मशानभूमीच्या परिसरात सध्या परप्रांतियांनी घरे बांधायला घेतली आहेत. या जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे पालिकेत नाहीत. आपण स्वत: खासदार निधीतून या ठिकाणी सुसज्ज स्मशानभूमी बांधली जावी याकरिता प्रयत्न केले होते. संतोष तुबकी नगराध्यक्ष असताना त्यांनीही प्रयत्न केले होते. परंतु जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे हे काम अडून पडले, अशी माहिती नगरसेवक हेमंत ना. गावकर यांनी दिली. त्याचबरोबर आपण चार रस्ता येथील कोमुनिदादीच्या जमिनीवर स्मशानभूमी उभारण्यासाठी पालिका मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवलेला आहे, अशी माहिती गावकर यांनी दिली.
पणसुले येथे नवीन स्मशानभूमीसाठी प्रयत्न
तत्कालीन नगरसेवक स्व. सुभाष देसाई यांच्या कारकिर्दीत पणसुले येथे स्मशानभूमी उभारण्यात आली होती. त्यासाठी पालिका निधीतून खर्चही केला होता. मात्र या जागेवर काही व्यक्तींनी दावा केल्यामुळे ही स्मशानभूमी वादात सापडली आहे. सध्या पणसुले येथील एका खासगी जमिनीवर नवीन स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी दिली.
स्मशानभूमीजवळ वीज ट्रान्सफॉर्मरची उभारणी
शिरेवाडा, नगर्से येथील स्मशानभूमीचे भविष्यात कधीच नूतनीकरण करता येऊ नये अशीच जणू परिस्थिती या ठिकाणी तयार करण्यात आली असून स्मशानभूमीच्या पायऱ्या बुजवून त्या ठिकाणी वीज ट्रान्स्फॉर्मर उभारण्यात आले आहेत. नगर्से, चापोली या भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ही तजवीज करण्यात आलेली असली, तरी 12 ते 15 हजार इतकी एकंदरित लोकसंख्या असलेल्या आणि 5 हजारांपैक्षा अधिक परप्रांतीय कामगार वास्तव्य करून असलेल्या पालिका क्षेत्रात एखादी सुसज्ज अशी स्मशानभूमी अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थानिक नगरसेवक असो अथवा पालिका मंडळ असो, गंभीरपणे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. यापूर्वी या पालिकेत मोलू गावकर, रंगनाथ गावकर, राजश्री गावकर, अंकिता नाईक यांनी या भागाचे नगरसेवकपद सांभाळलेले आहे. सध्या हेमंत ना. गावकर या प्रभागाचे नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत, मात्र हे काम नेमके कुठे अडले हे कुणीच सांगू शकत नाही.
पैंगीण स्मशानभूमीवर भिस्त
त्यामुळे या पालिका क्षेत्राची संपूर्ण भिस्त लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पैंगीणच्या स्मशानभूमीवर येऊन पडली आहे. या स्मशानभूमीसाठी पैंगीणच्या कोमुनिदादीने पाच हजार चौ. मी. इतकी जमीन दिलेली असून सरकारच्या आर्थिक सहकार्याने या ठिकाणी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. त्याची देखभाल कोमुनिदादीचे पदाथिकारी आणि स्थानिक व्यक्ती सांभाळत आहेत. आवश्यक तेवढा लाकडाचा साठा, त्याची तयारी, स्वच्छता या गोष्टी स्थानिक समिती पाहत असते. अंत्यसंस्काराला येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची जशी व्यवस्था या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे सर्व विधी करण्याची सोय देखील या ठिकाणी आहे.
लोलये, आगोंद, श्रीस्थळ या ठिकाणी देखील स्मशानभूमीची सोय आहे. मात्र पर्यटनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असलेल्या काणकोण नगरपालिकेच्या क्षेत्रात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे या भागातील लोकांना अंत्यसंस्कारांच्या वेळी एक तर पैंगीणला किंवा मडगावला धाव घ्यावी लागते.









