विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : थांब्याजवळ बस थांबत नसल्याच्या तक्रारी
वार्ताहर /किणये
राज्यात एकीकडे महिलांना मोफत बसप्रवास सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे महिलावर्गामध्ये उत्साह दिसून असून, बहुतांशी बसमध्ये गर्दी दिसून येत आहे. या योजनेमुळे महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाही मच्छे गावात बससुविधेचा अभाव दिसून आला. यामुळे स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत आहे. गावात बससेवेअभावी विद्यार्थ्यांना तासनतास बसथांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. तर आलेल्या बसमध्ये बसच्या पायरीवर थांबून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ या भागात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मच्छे गावाला एकही स्वतंत्र बससेवा नाही. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थीवर्गाला बसत आहे. गावातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना वाघवडे, देसूर, नंदिहळ्ळी व खानापूर या गावच्या बसफेऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. मात्र त्या त्या गावातून या बस प्रवाशांनी आधीच फुल्ल होऊन येतात. त्यामुळे मच्छे बसथांब्यावर या बसेस थांबविल्या जात नाहीत. अशा तक्रारी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहेत. मच्छे गावातील विद्यार्थी शाळा, हायस्कूल व कॉलेजसाठी टिळकवाडी, बेळगाव परिसरात येतात. या विद्यार्थ्यांना सकाळी शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर येणे होत नाही कारण बस थांब्यावर बसची वाट पाहूनही समोरुन जाणारी बस थांबवत नाहीत. यामुळे शाळा, कॉलेजला येण्यास उशिर होऊ लागला आहे. तसेच सायंकाळी घरी जातानाही हीच परिस्थिती आहे. यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून होत आहेत.
कायमस्वरुपी तोडगा काढा
मच्छे गावातील नागरिक गेल्या 3 वर्षापासून आपल्या गावात स्वतंत्र बससेवा सुरू करून द्यावी, यासाठी झगडत आहेत. अनेकवेळा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. तसेच मच्छे मुख्य रस्त्याच्या बस थांब्याजवळ अन्य गावावरुन येणाऱ्या बस थांबवत नसल्यामुळे रास्ता रोकोही करण्यात आला आहे. रास्ता रोको केल्यानंतर दोन तीन महिने बस चालक व वाहक याठिकाणी बस थांबवितात त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे राहते. यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
गावाला सर्व सुविधा मिळणे अपेक्षित
मच्छे गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. यामुळे गावाला सर्व सोयीसुविधा मिळणे अपेक्षित आहे. नगरपंचायत असलेल्या गावाला व भरपूर लोकसंख्या असूनही गावात स्वतंत्र बस सुरू करण्यात येत नाही. याची आम्हाला खंत वाटते. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे हाणारे त्रास याचा विचार करायला हवा, सकाळी शाळा, कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत असतात मात्र अन्य गावाहून येणाऱ्या बसचे वाहक व चालक बस थांबवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाणे अवघड बनले आहे.
– महादेव मंगणाकर, माजी सरपंच, मच्छे









