ऑनलाईन टीम / लडाख :
भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून गोळीबार केल्याचा चीनचा दावा भारतीय लष्कराने फेटाळून लावला आहे.
भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे चीनच्या सीमेत प्रवेश केला. तसेच तेथे तैनात असलेल्या चिनी सैन्याला इशारा देण्यासाठी गोळीबार केला, असा आरोप चीनने केला होता. त्यावर भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिले आहे. 7 सप्टेंबरच्या रात्री चीनच्या सैन्याकडूनच भारतीय सैन्याला चिथवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिक उपस्थित असलेल्या ठिकाणांच्या दिशेने हवेत अंदाधुंद गोळीबार केला, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA)कडून त्यांच्याच देशातील जनतेची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करण्यचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय लष्कराने चीनच्या नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केलेले नाही. गोळीबारासह कोणत्याही आक्रमक साधनांचा वापर केलेला नाही. नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडवण्यासाठी चीन प्रक्षोभक कारवाया करत आहे.
भारतीय सैन्य शांतता आणि विश्वासार्हता यासाठी ओळखले जाते. मात्र, देशाच्या अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे.









