ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादावरून दोन्ही देशात तणाव कायम आहे. हा वाद केवळ शांततेच्या मार्गानेच सोडवला जाऊ शकतो. चिनी सैन्याने अनेकदा सीमारेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी अनेकदा हाणून पाडला, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना दिली.
राजनाथ सिंह म्हणाले, भारत-चीन सीमावाद हा आता जटिल मुद्दा आहे. दोन्ही देशांना ते मान्य आहे. हा सीमावाद संयमाने सोडवणे आवश्यक आहे. सीमा वादावर जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही, असे 1993 आणि 1996 मध्ये दोन्ही देशात झालेल्या करारात म्हटले आहे. तसेच तणावाच्या काळात दोन्ही देश LAC जवळ सैन्याची तैनाती कमी ठेवतील, असेही त्यात म्हटले आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे भारतालाही सीमेवर सैन्याची तैनाती वाढवावी लागत आहे.
भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात
चीनने लडाखमधील भारताची 38 हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे बळकावली आहे. तसेच 1963 साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने POK मधील 5180 स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदेेशीरित्या चीनला दिला, असेही राजनाथ सिंह म्हणाले.









