वृत्तसंस्था/ मँचेस्टर
येथे सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 5 बाद 214 धावा जमवल्या होत्या. लाबुशेनने दमदार शतक झळकवले.
या कसोटीत यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आपले वर्चस्व राखताना पहिल्या डावात 275 धावांची भक्कम आघाडी मिळवली होती. मात्र ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 113 धावा जमवल्या होत्या. शनिवारी पावसामुळे उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला. त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्राला पावसाच्या विश्रांतीमुळे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियान 4 बाद 113 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. दरम्यान लाबुशेन आणि हेड यांनी पाचव्या गड्यासाठी 103 धावांची शतकी भागीदारी नोंदवली. लाबुशेनने 99 चेंडूत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने 161 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने शतक झळकवले. ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा 383 चेंडूत फलकावर लागल्या. चहापानापूर्वीच इंग्लंडच्या रुटने लाबुशेनला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्याने 173 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 111 धावा जमवल्या. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 71 षटकात 5 बाद 214 धावापर्यंत मजल मारली होती. मिचेल मार्श 31 तर ग्रीन 3 धावावर खेळत होते. इंग्लंडतर्फे मार्क वूडने 3 तर वोक्स आणि रुट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 61 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 90.2 षटकात सर्वबाद 317, इंग्लंड प. डाव 107.4 षटकात सर्वबाद 592, ऑस्ट्रेलिया दु. डाव 71 षटकात 5 बाद 214 (वॉर्नर 28, ख्वाजा 18, लाबुशेन 111, स्मिथ 17, हेड 1, मार्श खेळत आहे 31, ग्रीन खेळत आहे 3, अवांतर 5, वुड 3-27, वोक्स 1-31, रुट 1-32).









