वृत्तसंस्था/ अॅडलेड
6 डिसेंबरपासून येथे सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुसेनला अंतिम 11 खेळाडूतून वगळावे असे प्रतिपादन माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनने केले आहे.
लाबुसेन गेल्या काही सामन्यात फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पर्थच्या पहिल्या कसोटीत लाबूसेनने पहिल्या डावात 52 चेंडूना सामोरे जात केवळ 2 धावा जमविल्या. तर दुसऱ्या डावात तो 5 चेंडूत 3 धावा जमवित बाद झाला. लाबुसेन सध्या बॅडपॅचमधून जात असल्याने अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटीत त्याला अंतिम 11 खेळाडुतून वगळावे असे जॉनसनने म्हटले आहे. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी लाबुसेनला पुन्हा राष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही सामने खेळण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघातील लाबुसेन हा महत्त्वाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत 51 कसोटीत 48 धावांच्या सरासरीने 4,119 धावा जमविल्या आहेत. पर्थच्या पहिल्या कसोटीत अष्टपैलू मिचेल मार्शला दुखापत झाली होती. तसेच स्टिव्ह स्मिथच्या फॉर्मबद्दलही ऑस्ट्रेलियन संघाला चिंता वाटत असल्याचे जॉनसनने म्हटले आहे.









