पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी : पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ ब्लुमफौंटेन (द.आफ्रिका)
कठीण काळातही संयम, जिद्द आणि चिकाटीने खेळ कसा करावा आणि प्रतिस्पर्धी संघावर विजय कसा मिळवायचा याचे उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलियाने जगभरातल्या क्रिकेट संघांसमोर ठेवले. गुरुवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 3 गडी राखून विजय मिळवला. एकवेळ 7 बाद 113 अशी अवस्था झालेली असताना, मार्नस लाबुशेनने डाव सावरून दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला. त्याला अॅश्टन अॅगरनेही चांगली साथ संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. उभय संघातील दुसरा सामना आज ब्लुमफौंटेन येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात लाबुशेनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. पण तरी त्याने या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचे आव्हान होते, पण ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 113 धावांपर्यंत 7 विकेट्स पडल्या होत्या. यानंतर बॅटींग करताना कॅमेरॉन ग्रीनच्या डोक्याला बाउन्सर बॉल लागला. हाच सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. कारण ग्रीनच्या जागी लाबुशेनला संघात सब्स्टीट्यूट खेळाडू घेण्यात आले. यानंतर लाबुशेनने अॅश्टन अॅगरच्या साथीने आठव्या विकेटसाठी 112 धावांची विक्रमी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवून दिला. 80 धावांच्या नाबाद खेळीसाठी लाबुशेनला सामनावीराचा किताबही देण्यात आला.
दरम्यान, 223 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नर बाद झाला. कर्णधार मिचेल मार्शने 17 धावा, जोस इंग्लिसने 1 तर अॅलेक्स कॅरीने 3 धावा केल्या. मार्कस स्टोनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अवघ्या 17 धावांवर तो बाद झाला. ऑस्ट्रेलियाची एकवेळ 7 बाद 113 धावा अशी स्थिती होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कॅमरन ग्रीनला दुसऱ्याच चेंडूंवर कगिसो रबाडाने बाउन्सर मारला. तो चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला. फिजिओकडून तपासणी केल्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी सब्स्टिट्युट म्हणून मार्नस लाबुशेन आला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला. अॅगरने नाबाद 48 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
द.आफ्रिकेचा 222 धावांत खुर्दा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची सुरुवात खूपच संथ झाली. 9 व्या षटकात क्विंटन डीकॉकने विकेट गमावली. त्यानंतर रॉस्यू अवघ्या 8 धावा काढून तंबूत परतला. कर्णधार बवुमा मात्र अखेरपर्यंत मैदानावर राहिला. पण दुसऱ्या बाजूने त्याला कुणाचीही साथ मिळू शकली नाही. बवुमाने नाबाद शतकी खेळी साकारताना 142 चेंडूत 14 चौकार व 1 षटकारासह नाबाद 114 धावा केल्या. अॅडम मार्करमने 19 धावा, हेन्रिक क्लासेनने 14 धावा तर मार्को जेन्सनने 32 धावा केल्या. डेविड मिलरला खातंही उघडता आले नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 49 षटकांत 222 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 49 षटकांत सर्वबाद 222 (बवुमा नाबाद 114, मार्को जेन्सन 32, मॅरक्रम 19, हॅजलवूड 3, मार्क स्टोनिस 2 तर सीन अॅबॉट, झाम्पा, अॅगर, कॅमेरॉन ग्रीन प्रत्येकी एक बळी).
ऑस्ट्रेलिया 40.2 षटकांत 7 बाद 225 (लाबुशेन नाबाद 80, अॅगर नाबाद 48, ट्रेव्हिस हेड 33, रबाडा व कोटीज प्रत्येकी दोन बळी).









