वार्ताहर/धामणे
धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड (ये.), नागेनहट्टी या भागातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरूवात केली आहे. पण, कापणीसाठी रोजगाराच्या जमवाजमवीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कमी होवून उन्हाला सुरूवात झाल्याने आता या भागात भातकापणीला जोर आला आहे. परंतु कापणीला उशीर झाल्याने सर्वच भातपिके कापण्यासाठी आल्याने सर्वांनाच मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळविण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. यंदा सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी, चिखल आहे. त्यामुळे भातकापणी दिवसभर वाकूनच करावी लागत असल्याने यंदाही भातकापणी त्रासदायक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









