पुलाची शिरोली/ वार्ताहर
पुलाची शिरोली (सांगली फाटा) येथील युनिक ऑटोमोबाईलच्या ह्युंडाई शोरूममध्ये वीजेचा धक्का बसल्याने मजूर जागीच ठार झाला. भिमराव थावरू चव्हाण (वय 49, रा. नागाव, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत शिरोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोलीत सांगली फाटा येथे युनिक ऑटोमोबाईलचे ह्युंडाईचे शोरूम आहे. या शोरूममध्ये शोष खड्डयाचे काम सुरू आहे. भीमराव जाधव व त्याचे परिवारातील सदस्य हे काम ठेका स्वरुपात घेतात. पाच दिवसांपूर्वी हे काम सुरू झाले. मात्र पावसामुळे पुन्हा थांबले. आज पुन्हा हे काम चालू असताना दुपारी शोष खड्ड्य़ातले पाणी काढण्यासाठी पाण्यात सबमर्शिबल पंप सोडला होता. पण इलेक्ट्रिक जोडण्यांमध्ये खराबी असल्याने विजेचा प्रवाह खड्डय़ातील पाण्यात उतरला. याच पाण्यात भीमराव जाधव उभे असल्याने त्यांना विजेचा धक्का बसून ते शोष खड्डय़ात पालथे पडले. कुणाला काही समजण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांना दवाखान्यात नेण्याचा बहाणा करत पोलिसांना माहिती न देताच मृतदेह खाजगी दवाखान्यात नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह तेथेच टाकून व्यवस्थापनाने पळ काढला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पुन्हा मृतदेह शोरुमच्या दारात आणून ठेवला. शोरूमच्या प्रशासनाने मृत्यूची जबाबदारी टाळल्याने संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मृतदेह शोरूमच्या दारातच ठेवून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मृतदेह सुमारे अडीच तास शोरूमच्या दारात असताना कंपनीच्या एकाही अधिकाऱयाने संपर्क न साधल्याने नातेवाईक संतप्त झाले होते.
या घटनेची माहिती समजतात नागावचे सरपंच अरुण माळी आणि पदाधिकारी व ग्रामस्थांनी धाव घेतली.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील हे ही तेथे दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून घ्या. मगच मृतदेह स्विकारतो अशी ठाम भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याचा शब्द दिला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला. भीमरावची पत्नी संगीता हीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.