आणखी 4 वर्षे सरकारचे नेतृत्व करणार जोनास स्टोरे
वृत्तसंस्था/ ओस्लो
नॉर्वे या देशातील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला असून सत्तारुढ लेबर पार्टीने पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. परंतु लेबर पार्टीला अत्यंत चुरशीच्या लढतीत निसटता विजय मिळाला. नॉर्वेचे पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते जोनास गार स्टोरे यांनी विजयाची घोषणा केली. लेबर पार्टीने कर आणि जनकल्याणकारी धोरणांचा मुद्दा मांडत मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविले आहे.
नॉर्वेमध्ये देखील आता उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा उदय होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदारांचा कल पाहता पुढील काळात देशात उजव्या विचारसरणीचे पक्ष सत्तेवर येऊ शकतात याचे संकेत मिळाले आहेत. तर या निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान स्टोरे हे आणखी 4 वर्षे देशाचे नेतृत्व करणार आहेत. लेबर पार्टीच्या मताधिक्याची टक्केवारी केवळ 2.5 टक्के राहिले आहे. लेबर पार्टीला 28 टक्के मिळाली आहेत, तर सेंटर लेफ्ट पार्टीने लेबर पार्टीला समर्थन दिले आहे. 169 सदस्यीय नॉर्वेच्या संसदेत लेबर पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकूण 88 जागांवर विजय मिळाला आहे.
स्थलांतरित विरोधी पक्षाची लोकप्रियता
स्थलांतरितविरोधी अँटी इमिग्रेशन प्रोग्रेस पार्टीला यावेळी 24 टक्के मते मिळाली आहेत. कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला केवळ 15 टक्के मते मिळाली आहेत. मागील दोन दशकांमधील ही पक्षाची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. नॉर्वेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थलांतरित, कर आणि जनकल्याणकारी धोरणांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. परंतु रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या शुल्क धोरणांदरम्यान वर्तमान सरकारच सत्तेवर राहणे नॉर्वेच्या हिताचे ठरेल असे बोलले गेले.









