वसगडेच्या यादव कुटुंबाच्या कष्टाला सुहासच्या एमपीएससीतील यशाचा साज
वसगडे प्रतिनिधी
पाखराला उंच उडायचे असेल तर घरटे सोडावे लागते. पण त्यासाठी पंखात बळ आणि मनात आत्मविश्वासही हवा. तरच उंच भरारी साधते. सुहास तानाजी यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2019 मध्ये राजपत्रित लेबर ऑफिसरपद पटकावले. उच्चशिक्षित असून नोकरीत अन्यायकारक ड्युटीने पेटून उठून सात वर्षे दिलेली त्यांची झुंज यशस्वी ठरली आहे.
एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असताना प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणार्या कुटुंबात पाच भावंडांची तिसरी पिढी वसगडेत एकत्र नांदत आहे. त्याच ‘पंचरत्न’ कुटुंबाला सुहास यादवने लेबर आफिसरपदाचा साज चढवला. त्यामुळे पंचक्रोशीतुन कौतुक होवुन ग्रामस्थांनी मिरवणूक काढत स्वागत केले. एकत्र कुटुंबाची ताकद, प्रेरणा, उर्जा मिळाली त्यामुळेच हे यश मिळाल्याचे सुहास सांगतात.
प्राथमिक शिक्षण भिलवडी स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत. खंडोबा वाडीतील भारती विद्यापीठ प्रशालेत माध्यमिक, पलुस येथील ल.कि कॉलेजमधून विज्ञान शाखेतून १२ वी, तद्नंतर वसंतदादा कॉलेज सांगली मधुन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण पूर्ण केले.
एका ड्युटीने जीवन बदलले
एका नामवंत कंपनीत काम करताना रात्री एक ते आठ ड्युटी लावण्यात आली. वास्तविक मेंटेनन्स डिपार्टमेंटला नसताना ती ड्युटी जाणीवपूर्वक लावण्यात आली. कंपनीमध्ये अधिकारी लोक बाहेरचे, कामगार स्थानिक होते. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचा प्रकार व्हायचा. त्यामुळे उच्चशिक्षितांनाही वॉचमन सारखी नाईट ड्युटी टाकण्याचे प्रकार घडत असत. याचे वाईट वाटल्याने त्याच दिवशी राजीनामा दिला. तलाठी पदावर कार्यरत असणारा इंजिनिअरिंगचा मित्र प्रमोद साळुंखे याने एमपीएससीचा सल्ला दिला आणि जिवनाची दिशा बदलल्याचे सुहास सांगतात.
सुरुवातीची दोन वर्षे यूपीएसी चा अभ्यास केला ते घडणार नसल्याने एमपीएससीचा निर्णय घेत 2018 साली शासकीय संस्थेतून प्रवेश मिळवत दहा हजार जणांमध्ये साठ विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्शन झाल होत. अभ्यासिकेचा, वातावरण चांगला उपयोग करत सहा महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण केल. नंतर कोल्हापूरमध्ये राहायचा निर्णय घेतला.
एकत्र कुटुंब पद्धतीत माझ्या घरी इतर सगळे भाऊ, चुलते शेतात राबतात पण सात वर्षे घरातून कधी तुलना झाली नाही. 2020 मध्ये कमी मार्क पडले त्या वेळेला खूप त्रास झाल्याचे सुहास सांगतात. त्यावेळी पाहुणे मंडळींनी अजून किती दिवस अभ्यास करणार म्हणत सोडून देण्याचा सल्ला दिला. पण जिद्द सोडली नाही. सात वर्षे अभ्यास करताना कुटुंबाची जबाबदारी कुठेही पार पडली नाही. पण कौटुंबिक मानसिक स्थैर्यामुळे यशस्वी झालो. ग्रामीण भागातून एमपीएससीला कोणी जात नाही पण हे पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे आवाहन सुहास यादव करतात.
डीवायएसपीची इच्छा. ..गुणांचे महत्त्व…
2019 ला पहिल्यांदा परीक्षेत उत्तीर्ण झालो पण वीस गुणात संधी हुकली. 2020 ला पाच गुणात संधी गेली. पण जानेवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवले. एकूण 20 पदे 405 जागा होत्या. अजून अर्धा गुण जास्त असता तर सहाय्यक निबंधक,एक असता तर असिस्टंट बीडिओची, दोन जास्त असते तर उपशिक्षणाधिकारी पोस्ट मिळाली असती. डीवायएसपी होण्याची इच्छा होती परंतु गुण कमी मिळाल्या मुळे हे केडर निवडले. पण ही नोकरी सांभाळून प्रयत्न करणार असे सुहास सांगतात.








