विविध विभागातील 37 कामगारांचा भेटवस्तू देऊन सन्मान : कामगारांकडून कृतज्ञता व्यक्त
बेळगाव : कामगार दिनाचे औचित्य साधून ‘तरुण भारत’ कार्यालयामध्ये विविध विभागात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या हस्ते हाऊस किपिंग, पोस्ट प्रेस,मेकॅनिकल विभाग, स्टोअर विभाग येथे काम करणाऱ्या 37 कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोमा ठाकुर म्हणाल्या, कोणताही उद्योग, व्यवसाय किंवा संस्था यामध्ये कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यांच्या श्रमामुळे संस्था आणि उद्योग यांची प्रगती होते. त्यामुळे त्यांचे महत्त्व आणि योगदान लक्षात घेऊन त्यांचा सत्कार करणे हे आवश्यक आहे.
यावेळी राहुल मोरे यांनी सर्वांच्यावतीने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रिटिंग विभागाच्या मागणीनुसार कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांनी सिटी लाईन, स्टार लाईन, सिटीपी अशा अद्ययावत मशीन प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून दिल्या. 18 जुलै 2024 पासून त्यांनी आणलेल्या सिटी लाईन मशीनमुळे आता प्रत्येक पानाची रंगीत छपाई (कलर प्रिंटिंग) करणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे आणि ठाकुर परिवाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे सांगितले. याप्रसंगी व्यवस्थापक गिरीधर शंकर, प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धैर्यशील पाटील व तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.









