वृत्तसंस्था/ कोलकाता
स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ पश्चिम बंगालमध्ये तऊण प्रतिभांना चालना देण्याच्या उद्देशाने अकादमी स्थापन करणार असून त्यासाठी राज्य सरकारसोबत करारावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. माद्रिदमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ला लीगाचे अध्यक्ष झेवियर तेबास यांच्यात झालेल्या बैठकीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
स्पेनच्या 12 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या बॅनर्जी यांनी गुऊवारी संध्याकाळी माद्रिदमध्ये तेबास यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमवेत बैठक घेतली. यामध्ये दोन्ही बाजूच्या क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांना जोडून संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या उल्लेखनीय सामंजस्य कराराचा हेतू फुटबॉलला प्रोत्साहन देण्याचा आहे. ला लीगा पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल प्रशिक्षण अकादमी विकसित करेल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
या करारानुसार राज्यातील प्रशिक्षक आणि खेळाडूंना ला लीगाचे प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. ते पश्चिम बंगालच्या फुटबॉल क्लबांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांचा अनुभव आणि कौशल्य देखील वापरतील, असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बॅनर्जी यांच्यासोबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि कोलकातातील दिग्गज फुटबॉल क्लब मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मेडन स्पोर्टिंगचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. बॅनर्जी यांनी तेबास यांना पश्चिम बंगालमध्ये आमंत्रित केले आहे.









