वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट, जर्मनी
येथे सुरू असलेल्या एटीपी स्टुटगार्ट ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या वु यिबिंगने त्याचे आव्हान संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली.
यिबिंगने या लढतीत किर्गीओसवर 7-5, 6-3 अशी मात केली. हा सामना 70 मिनिटे चालला. गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमधून गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तो सात महिने टेनिसपासून दूर होता. 64 व्या स्थानावर असणाऱ्या यिबिंगने किर्गीओसशी पहिल्या फेरीत मुकाबला झाला, याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. ग्रास कोर्टवरील तो एक सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचे तो म्हणाला. यिबिंगला किर्गीओसच्या अनेक बिनतोड सर्व्हिसेना सामोरे जावे लागले. तरीही त्याने संयम ढळू न देता अखेर विजय मिळविला. सहा वर्षांपूर्वी विम्बल्डनमध्ये कनिष्ठ विभागात यिबिंगने भाग घेतला होता, त्यानंतर त्याने येथे एटीपी ग्रास कोर्टवरील पहिला सामना खेळला. गेल्या वर्षी किर्गीओस या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता आणि उपांत्य फेरीत त्याला अँडी मरेने हरविले होते.









