वृत्तसंस्था/ एडिनबर्ग (स्कॉटलंड)
स्कॉटलंड क्रिकेट सघाचा कर्णधार काईल कोएत्झरने आपण कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याचे शनिवारी जाहीर केले. आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुपर लीग विभागीय पात्रतेच्या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यामध्ये संयुक्त अरब अमिरात संघाकडून स्कॉटलंडला पराभव पत्करावा लागला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नेतृत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्याने घेतला.
काईल कोएत्झरने स्कॉटलंडतर्फे खेळलेल्या 214 पैकी 110 सामन्यात संघाचे कर्णधारपद भूषविले. 2015 साली झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेश विरूद्ध सामन्यात त्याने शानदार पहिले वनडे शतक (156) झळकविले होते. कोएत्झरने 2021 साली स्कॉटलंड संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करत प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळवून दिले होते. येत्या जुलै महिन्यात स्कॉटलंड संघाच्या नामिबिया आणि नेपाळ यांच्याविरूद्ध मालिका होणार असून या मालिकापूर्वी स्कॉटलंड संघाचा नवा कर्णधार जाहीर केला जाईल.









