कोल्हापूर / विनोद सावंत :
पुरवठा विभागाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. गेल्या आठवड्यात सर्व्हर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नव्हता. त्यामुळे पुरवठा विभागाची कामे ठप्प झाली होती. याचा फटका ‘ई’ केवायसी करणाऱ्या लाभार्थ्यांना बसत आहे. ‘ई’ केवायसीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांकडून अॅप्रुव्हल (मंजुरी) दिली नसल्याने ९ लाख ५४ हजार लाभार्थ्यांची ई केवायसी लटकली आहे.
राज्य शासनाने रेशनकार्डधारकांची ‘ई’ केवायसी बंधनकारक केली आहे. शासनाने यासाठी तिसऱ्यांदा दिलेली वाढीव मुदतही ३० जून रोजी संपली होती. ३१ जुलैपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली होती. यादरम्यान, केवायसी झाली नाही तर धान्य बंद होणार किवा रेशनकार्ड निष्क्रीय होणार, असा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे लाभार्थ्यांकडून ई केवायसी करण्यासाठी धडपड सुरू होती. पण आठ दिवसांपासून पुरवठा विभागाचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहेत. त्यामुळे रेशनकार्ड संदर्भातील सर्व कामासह ई केवायसीच्या कामांवरही परिणाम होत आहे.
सर्व तांत्रिकी अडचणीवर मात करत प्रशासनाने ई केवायसीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. परंतु अंतिम टप्प्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून ऑनलाईनने मान्यता देतानाच सर्व्हर डाऊन झाला, त्यातून अ-नेकांची ई-केवायसी होऊ शकलेली नाही. परिणामी जिल्ह्यातील केवळ अंतिम मान्यतेसाठी ९ लाख ५४ हजार ३०९ लाभार्थ्यांची केवायसी लटकली आहे.
संबंधित लाभार्थ्यांचा यामध्ये दोष नसताना केवळ तांत्रिक बिघाडाचा फटका त्यांना बसत आहे. प्रशासनाकडून केवायसी तात्काळ करण्याचे आवाहन केले जाते. दुसरीकडे यंत्रणा सक्षम नाही. केवायसीची प्रक्रिया करूनही मान्यता मिळाली नसल्याने केवायसी नसलेल्या यादीत संबंधितांची नावे केवायसी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. रेशन दुकानदाराकडूनही त्यांना वारंवार केवायसीबाबत विचारणा होते. यामुळे लाभार्थी आणि रेशन दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
- राज्यात कोल्हापूर ‘टॉप’वर
रेशनकार्ड ‘ई’ केवायसीमध्ये राज्यात कोल्हापूर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. २५ लाख लाभार्थ्यांपैकी २१ लाख लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे. १७.४५ टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी आहे. ३ लाख लाभार्थ्यांचे आधार लिकिंग झाली असून केवळ केवायसी बाकी आहे.
- प्रलंबित लाभार्थ्याची प्रक्रिया पूर्णत्वासाठी १५ दिवस लागणार
सर्व्हर पूर्ण दिवसभर बंद होतो, असे नाही. काही वेळ सुरू असतो. तर काही वेळा बंद राहतो. परिणामी, ई केवायसीची कामे गतीने होत नाहीत. यामध्ये बहुतांशी लाभार्थ्यांनी केवायसीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु केवळ वरीष्ठाच्या मान्यता बाकी असल्याने केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासकीय पातळीवरही प्रलंबित असणारे सर्व काम पूर्ण करण्यासाठी १५ दिवस लागतील, अशी माहिती पुरवठा विभागातील तांत्रिक विभागाने दिली.
तांत्रिक कारणामुळे रेशनकार्ड धारकांची ई केवायसी झालेली नाही. काही लाभार्थ्याची प्रक्रिया झाली आहे. परंतु सर्व्हर डाऊनमुळे प्रशासकीय पा-तळीवर अंतिम प्रक्रिया प्रलंबित आहे. अशा संबंधित लाभार्थ्यांची ई केवायसी पॉस मशिनमध्ये झाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रेशन दुकानदारांची प्रलंबित केवायसीची यादी फुगीर दिसत आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे ई केवायसीचे काम प्राधान्यक्रमाने करावे.
– डॉ. रविंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार महासंघ
जिल्ह्यात रेशनची दुकाने- १ हजार ६८५
अंत्योदय शिधापत्रिका धारक- ५१ हजार ८१9
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक-५ लाख ३५ हजार ४२५
अन्नसुरक्षा लाभार्थी-२५ लाख ३८ हजार १५१
केवायसी झालेले लाभार्थी-२१ लाख ४० हजार ८५
“ई” केवायसी झाले नसलेले लाभार्थी-३ लाख ८८ हजार ६६९








