वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत कुवेत फुटबॉल संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. शनिवारी झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात कुवेतने बांगलादेशवर 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. आता भारत किंवा लेबेनॉन यांच्याबरोबर कुवेतचा अंतिम सामना 4 जुलैला होणार आहे.
शनिवारच्या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार आणि आक्रमक झाला. उभय संघाच्या भक्कम बचावफळीने तसेच गोलरक्षकांच्या अभेद्य कामगिरीमुळे पहिल्या 45 मिनिटात गोलफरक कोराच राहिला. खेळाच्या पूर्वार्धार्त मिळालेल्या ज्यादा वेळेमध्ये अब्दुल्ला अल ब्लोशी याने कुवेतचा एकमेव निर्णायक गोल केला. या संपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या. बांगलादेशच्या रकीब हुसेनने शेवटच्या 10 मिनिटामध्ये अनेक आक्रमक चाली करत कुवेतच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण कुवेतचा गोलरक्षक अब्दुल रेहमान याने रकीब हुसेनचे दोन फटके अचूकपणे थोपवल्याने बांगलादेशला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.