बेळगाव : भरधाव ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि. 7 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास बेळगाव-जांबोटी रोडवरील मच्छेनजीक घडली अभिषेक संजय शिरोशी (वय 23) रा. गणपत गल्ली कुट्टलवाडी, ता. बेळगाव असे मृताचे नाव असून अपघाताची नेंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालक मारुती बाळू नाईक रा. बहाद्दरवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, अभिषेक हा उद्यमबाग येथील एका कारखान्यात कामाला जात होता. सोमवारी सायंकाळी 4 वा. तो चौथ्या शिफ्टला गेला होता.
रात्री 1 वा. शिफ्ट संपवून तो आपल्या केए 22 एचक्यू 2305 या मोटारसायकलवरून बेळगाव-जांबोटी रोडवरून घराकडे जात होता. केए 22 डी 6820 क्रमांकाची ट्रक रात्री 2 च्या सुमारास जांबोटीकडून बेळगावकडे येत होती. भरधाव ट्रकने मच्छे येथील शिंदे कॉलनीनजीक अभिषेकच्या मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. यावेळी अभिषेकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी संजय शिरोशी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी अपघातास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालक मारुती नाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अभिषेकचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









