समुद्र खवळलेला नसल्याने मध्यरात्रीपासूनच पाण्यात उतरण्याची ट्रॉलर्सना संधी, मात्र परराज्यांतील बहुतांश कामगार परतणे बाकी
पुंकळ्ळी : नवा मासेमारी मोसम दि. 1 ऑगस्टपासून सुरू होत असून त्यासाठी दक्षिण गोव्यातील मुख्य असलेली कुटबण जेटी ही सज्ज झालेली आहे. यावेळी समुद्र हा नेहमीसारखा खवळलेला नसल्यामुळे मच्छीमारांना सुऊवातीपासूनच मासेमारी करता येईल असे दिसत आहे. मात्र त्यादृष्टीने अजून जेटीवर बहुतांश कामगार पोहोचलेले नाहीत. कुटबण जेटीवर साधारणपणे 400 लहान-मोठे ट्रॉलर्स असून त्यात दोन, तीन चार व सहा सिलिंडर्स अशा विविध क्षमतेचे ट्रॉलर्स आहेत. यापैकी काही ट्रॉलर्सवरचे कामगार परतलेले असून त्यांच्याकडून मोसमाची तयारी चाललेली आहे. साधारणपणे 20 ते 25 टक्के कामगार परतलेले आहेत, तर 75 ते 80 टक्के कामगार अजून ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून परतायचे बाकी आहेत. या ट्रॉलर्सवर काम करणारे बहुतेक कामगार परप्रांतीय असून कोविडच्या काळात या कामगारांना परराज्यांतून आणण्यासाठी ट्रॉलरमालकांनी बसेस पाठविल्या होत्या. यंदाही काही ट्रॉलरमालकांनी अशा बसेस पाठविल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
जेटीवर गजबज नाही
एरव्ही जेटीवर मोसम सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीच गजबज सुरू व्हायची. मात्र यंदा बहुतेक कामगार परतले नसल्याने तशी गजबज दिसत नाही. त्याचप्रमाणे जेटीवर असलेली दुकानेही नेहमीप्रमाणे उघडी झाली नाहीत, अशी स्थिती नुकतीच जेटीला भेट दिली असता दिसून आली. यावेळी मोसमाच्या सुऊवातीला पाण्यात उतरण्याच्या बाबतीत काहीही अडचण येणार नाही असे दिसते. एरव्ही मासेमारी मोसम सुरू होण्याच्या वेळेस वादळ असायचे आणि समुद्राला उधाण आलेले असायचे. खास करून साळ नदीच्या मुखाशी उसळणाऱ्या लाटा व सोसाट्याचा वारा यामुळे समस्या भेडसावून बहुतेक ट्रॉलर्सना पाण्यात उतरणे कठीण व्हायचे. त्यामुळे मोसम सुरू झाला, तरी दहा-पंधरा दिवस वाया जायचे. पण यंदा समुद्र शांत असल्यामुळे आणि खाडीच्या मुखाशी लाटांचा तडाखा बसण्याची भीती नसल्याने बहुतेक ट्रॉलर्स समुद्रात रवाना होतील असे दिसून येत आहे. कितपत मासे मिळतील याविषयी मच्छीमार साशंक आहेत. कारण प्रत्येक वेळी दर्यात वादळ झालेले असायचे आणि त्यामुळे मासळी किनाऱ्यालगत यायची. पण यंदा असे वादळ झालेले नाही. त्यामुळे मच्छीमार साशंक बनलेले आहेत. तसेच नजीकच्या काळात वादळ झाले, तर जी मासळी हाताला लागण्याची शक्यता आहे तिही गायब होण्याची भीती काही मच्छीमारांनी बोलून दाखविली.
सोलार कोळंबी पकडण्याचे लक्ष्य
मासेमारी मोसमाच्या सुऊवातीला सोलार कोळंबी हे मच्छीमारांचे प्रमुख लक्ष्य असते आणि यंदा ही कोळंबी मोठ्या प्रमाणात पकडणे शक्य होईल, असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. कोलवासारख्या भागांतील काही छोट्या होड्यांनी सोलार कोळंबी पकडून त्याची झलक दाखविली आहे. त्याशिवाय नुवे-खणगिणी भागातही लहान होड्यांनी बऱ्यापैकी सोलार कोळंबी पकडलेली आहे.









