डॉ. अनिता तिळवे यांचे प्रतिपादन
फोंडा : कवी, कादंबरीकार, नाटककार, ललित लेखन अशा बहुतेक साहित्य प्रकारामध्ये दर्जात्मक निर्मिती कऊन मराठी साहित्य क्षेत्राला भरीव योगदार दिलेले कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर हे वैश्विक साहित्यातील साधक होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यानी मराठी साहित्याची सेवा केली. ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कऊन काव्यक्षेत्रातील आपली क्षमता त्यांनी सिद्ध केली. साहित्याच्या प्रवासामध्ये मराठी भाषेला उच्च दर्जा प्राप्त कऊन देणाऱ्या साहित्यिकांमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता असे उद्गार कवी आणि साहित्यिक डॉ. अनिता तिळवे यांनी काढले.
प्रागतिक विचार मंच आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य अशोक तरळे, साहित्यिक रमेश वंसकर, थ्रिफ्ट सोसाटीचे व्यवस्थापक साळू भगत व आयोजन संस्थेचे अध्यक्ष जयवंत आडपईकर हे उपस्थित होते. फोंडा येथील थ्रिफ्ट सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशोक तरळे म्हणाले, प्रतिभेची व्याप्ती व्हायची असेल तर साहित्यविषयीचा ध्यास पाहिजे. संतमहंत हे शिकलेले नव्हते. परंतु त्यांच्या रचना सामान्यांसाठी ज्ञानदायी ठरल्या. त्यांचे बोल अभंग झाले. माधुरी उसगावकर यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. रमेश वंसकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गाकुमार नावती यांनी तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.









