महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष धक्क्या-धक्क्यामागून धक्के देत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर आणि किंगमेकर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करुन विसावला आहे. शिंदेशाहीचे नवे सरकार बहुमत चाचणी व सभापती निवडीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. शिवसेनेतील बंडखोरी व पात्र-अपात्रतेची लढाई सर्वोच्च न्यायालयात निर्णयासाठी आहे. तेथे काय फैसला होतो हे महत्वाचे. शिंदेशाही त्यातून सहीसलामत सुटली तर जनमताचा कौल ज्यांना लाभला ती भाजपा-सेना युती नव्या रुपात शिंदेशाही म्हणून कार्यरत व्हायला कोणताच अडथळा उरणार नाही. राज्यात विशेषतः कोकण, चिपळूण, मुंबई परिसरात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. कोल्हापुरची पंचगंगा इशारा पातळीवरुन वाहते आहे. दक्षिण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ओघानेच नदीकाठी महापुराची धास्ती घेतलेले नागरिक सतर्क झाले आहेत. आपत्ती निवारण कक्ष, एन.डी आर एफची पथके, धरणातील पाणीसाठा व विसर्ग यांचे नियोजन व शेजारी कर्नाटक राज्याशी सुसंवाद ठेवण्यावर भर दिला आहे. तथापि सरकार व मुख्यमंत्री नवे आहेत व अजून मंत्रीमंडळ खातेवाटप वगैरे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. ओघानेच महापुराचे तडाखे सोसलेला दक्षिण महाराष्ट्र चिंतेत आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे शिंदेशाही सरकार सत्तारुढ झाले असले तरी या सरकारचा बॅकबोन व शक्ती भाजपा आहे. भाजपाचे नेतृत्व हैद्राबादला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीत गुंग आहे. भाजपाने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली धक्क्या मागून धक्के देण्याची स्टाईल आत्मसात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू हे नाव त्यांनी पुढे आणले आहे. उपराष्ट्रपती पदासाठीही असेच धक्कादायक नाव पुढे येणार अशी चर्चा आहे. भाजपा राजकारणातील घराणेशाही आणि प्रस्थापित धनदांडगे-जातदांडगे यांना दूर सारुन नव्यांना संधी देत आहे. त्यामागे निश्चित काही योजना आहे. महाराष्ट्रात शेवटच्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती पण भाजपा श्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारा असे आदेश दिले. परिवारवादी पक्ष संपवण्याच्या आणि विरोधकाचे राजकीय मुद्दे मोडीत काढण्याचा त्यामागे भाजपाचा डाव होता, आहे हे लपून राहिलेले नाही. ठाकरे परिवाराची शिवसेना, गांधी परिवाराची काँग्रेस आणि पवार कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांना राजकीय तडाखा देताना भाजपाने मराठा कार्डही खेळले आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या शिवसैनिकाला स्वतःचे 105 आमदार असूनही भाजपाने पाठिंबा दिला यामागे पवार-ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा डाव होता व त्यांचे परिणाम आता दिसू लागतील. मविआचा शरद पवारांचा प्रयोग, अनैसर्गिक युती म्हणून ओळखला जातो. या प्रयोगातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्याचा खूप बोलबाला झाला आणि शरद पवारांचे किमयागार म्हणून कौतुक झाले. देशातही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाला धोबीपछाड देणार आणि राज्यात 25 वर्षे मविआची सत्ता राहणार वगैरे वल्गना सुरु झाल्या पण आता हाच प्रयोग तोंडघशी आल्याने व सत्ता गेल्याने वेगळय़ा अर्थाने चर्चिला जातो आहे. आगामी काळात मविआ एकसंघ राहणार का? इथपासून शरद पवारांनी शिवसेनेला जवळ घेऊन संपवले इथंपर्यंत राजकीय पंडीत आपली मते मांडत आहेत. पण या प्रयोगाचा शिवसेना व काँग्रेसला मोठा फटका बसला हे स्पष्ट दिसते आहे. मुंबई व औरंगाबाद महापालिका निवडणुकीनंतर मविआचे चित्र अधिक स्पष्ट होईल. तथापि मविआच्या अपयशाचे सूर मोठय़ा आवाजात ऐकू येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर काँग्रेस बळजबरीने मविआत होती. मविआत काँग्रेसला आवाज नव्हता, असे म्हणू लागलेत. शिवसेनेत जसा असंतोष आहे. तसा तो काँग्रेसमध्येही धुसफुसतोय. सत्ता गेल्यावर आता तो अधिक तीव्रतेने ऐकू येईल. एकूणच महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर राजकारण कूस बदलताना दिसते आहे. येत्या काही दिवसात राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद सदस्यांची नावे व नियुक्ती होईल असे दिसते आहे. यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यापासून पंकजा मुंढेंपर्यंत विविध नावांची चर्चा सुरु आहे. केशव उपाध्ये, माधव भंडारी वगैरे निष्ठावंतांची नावेही आहेत. भाजपाची मंत्री यादी कशी होणार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदार व मंत्र्यांना कशी संधी मिळणार हे बघावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे गृह व अर्थ खाते स्वतःकडे घेणार असे म्हटले जात आहे. फडणवीस टीममधील कोअरगटाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे उघड आहे. पण यावेळी नव्यांना, निष्ठावंतांना खाती मिळावीत म्हणून रचना केली जाते आहे. मंत्रिमंडळ करताना समतोल महत्वाचा असतो. तो कसा राखला जातो याकडेही सर्वाचे लक्ष आहे. त्याच जोडीला भाजपाचे प्रदेश अध्यक्षपद ऍड. आशिष शेलार यांच्याकडे जाणार असे मानले जाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तयारीचे नेते आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गटाचे दोनशे आमदार निवडून येतील. तूर्त मंत्रिमंडळात संधी कोणाला मिळते, कोणती खाती कोणाला मिळतात. शिवसेनेचे आमदार पक्ष सोडून गेले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिका व राजकीय संघर्षासाठी सज्ज झाले आहेत. राजकारण खूप झाले. लोकहित, महाराष्ट्रहित होणार का? आणि सत्तेचे डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास गाडा वेगवान करणार का? हा सवाल आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आणि पेट्रोल, डिझेल दरात कर कपात अशा घोषणांनी नवीन सरकार मैदानात उतरले आहे. अजित पवार यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळाले आहे. पावसाळा अधिवेशनात आणि मंत्रिमंडळ शपथविधीनंतर राजकारणाचे रंग स्पष्ट होतील तूर्त राजकारणाने कुस पालटली आहे.
Previous Articleब्रिटनमधील बोरिस जॉन्सन सरकार संकटात
Next Article देशात महागाईपासून दिलासा मिळण्याचे संकेत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








