पुणे / प्रतिनिधी :
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला डीआरडीओचा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्ज, तसेच आवाजाच्या चाचणीवर शुक्रवारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी झाली. राज्य दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) वरिष्ठ अधिकारी सुनावणीस उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने एटीएस अधिकाऱ्यांना फटकारले.
कुरुलकर याच्या जामीन अर्जावर, तसेच आवाजाच्या चाचणीवर (व्हॉइस लेअर सायकॉलीजील ऍनलिसिस टेस्टवर) विशेष न्यायाशीध व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (18 ऑगस्ट) विशेष न्यायालयात सुनावणीची वेळ निश्चित करण्यात आली होती. सरकार पक्षाचे आणि बचाव पक्षाचे वकील सुनावणीस उपस्थित होते. मात्र, एटीएसचे तपास अधिकारी सुनावणी उपस्थित नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यानंतर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याची सूचना केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही एटीएसचे अधिकारी उपस्थित झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने वेळ न पाळल्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांना फटकारले. यापुढे न्यायालयाने निश्चित केलेल्या सुनावणीस एटीएस अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीस कुरुलकर दूरसंवाद प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरसिंग) हजर झाला. त्यानंतर एटीएसचे अधिकारी सुनावणीस उपस्थित राहिले. बचाव पक्षाचे वकील ऍड. ऋषीकेश गानू यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील ऍड. विजय फरगडे यांनी कुरुलकरने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितली. ऍड. गानू यांनी सरकार पक्षाच्या युक्तीवादास विरोध केला. कुरुलकर मे महिन्यापासून अटकेत आहे. त्याच्याविरुद्ध 7 जुलै रोजी आरोपीपत्र दाखल झाले होते. एटीएसला याप्रकरणात तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे, असे ऍड. गानू यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कुरुलकरच्या जामीन अर्जावर 25 ऑगस्टला सुनावणी
एटीएसच्या मुंबई कार्यालयातून म्हणणे सादर होणार आहे. याप्रकरणात लवकरात लवकर एटीएसकडून लवकरच म्हणणे सादर केले जाईल, असे तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी सांगितले. कुरुलकरचा जामीन अर्ज, आवाजाच्या चाचणीवर 25 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.








