पहाटेपर्यंत चालतात पार्ट्या : पोलीस झोपलेले
फोंडा : फोंडा-बेळगाव महामार्गाशी संलग्नीत असलेल्या कुर्टी बगल रस्त्यामुळे वाहतुकीची चांगली सोय झाली खरी, पण त्यापेक्षा दारुड्यांसाठी हा रस्ता हक्काचा दारुअड्डा बनला आहे. सायंकाळी अंधार पडल्यापासून पहाटे पर्यंत या बगल रस्त्यावर ठिकठिकाणी दारुच्या पार्ट्या रंगतात. तेथे चालणारा आरडाओरडा व शिवीगाळ यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांची झोप उडवली आहे. पहाटे मोर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक व विशेषत: महिलावर्गाने तर या प्रकारांचा धसका घेतला आहे. साफा मशिद पासून सहकारी स्पाईस फार्मपर्यंत साधारण तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाण पुलासह असलेल्या या बगल रस्त्यावरील पथदीप पेटत नाहीत. या अंधाराचा फायदा घेऊन दारुड्यांच्या टोळक्यानी या ठिकाणी नशापानाचे अअड्डा थाटले आहेत. बगल रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रहिवाशी इमारती आहेत. या अड्डायांवर रात्रभर चालणारा आरडाओरडा व धिंगाण्यामुळे हे नागरिक त्रस्त झाले आहे. बगल रस्त्याच्या दोन्ही बाजूने मॉर्निंग वॉकसाठी जागा सोडण्यात आली आहे. ही जागा दाऊड्यांनी अडविली आहे. तेथे मोठ्या प्रमाणात बियर व दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून मुद्दामहून फोडल्या जाणाऱ्या बाटल्यांच्या काचाही सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. त्यामुळे पहाटे मोर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांना या बाजूने जाण्याची सोय राहिलेली नाही. बरीच टोळकी सकाळपर्यंत तेथे मुक्काम ठोकत असल्याने मोर्निंग वॉकचा मार्गही अडवला जातो. या प्रकारामुळे महिला वर्गाने सकाळी चालण्यासाठी जाणे नाईलाजाने बंद केले आहे. काही दिवसापूर्वी सकाळी वॉकसाठी निघालेल्या अशाच एका महिलेला अज्ञात स्कूटरचालकाने पाठीमागून धक्का देत रस्त्यावर पडले होते. बगल रस्त्यावरील या गैरप्रकारांबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असून पोलिसही त्याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. फोंड्याचे आमदार व मंत्री रवी नाईक यांच्यापर्यंत नागरिकांच्या या तक्रारी पोचविल्या असून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या दारूच्या अ•dयांना आळा घालण्यासाठी रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.









