संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकात संताप
वार्ताहर /किणये
ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च केला जातो. मात्र, पश्चिम भागातील कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता या रस्त्यासाठी कोणतीच योजना मंजूर होत नाही का? असा सवाल या भागातील वाहनधारक व नागरिक करीत आहेत. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे.
कर्ले ते बेळवट्टी हा सुमारे साडेचार किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा बराच भाग वाहून गेला. यामुळे रस्त्याच्या तीन-चार ठिकाणी मोठमोठी भगदाड पडली आहेत. तसेच रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. यामुळे सध्या हा रस्ता शेतशिवाराकडे जाणारा कच्च्या स्वरुपाचा बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणेही मुश्कील बनले आहे.
बेळवट्टी भागातील कामगारवर्ग कर्लेमार्गे उद्यमबाग व मच्छे या औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी येतो. या कामगारवर्गाला रात्रीच्या वेळीही या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावर मोठमोठे ख•s पडल्यामुळे अपघाताच्या अनेक किरकोळ घटना घडलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
रस्ता समस्येमुळे विनाकारण भुर्दंड

गेल्या तेरा दिवसांपूर्वी मी आणि माझी पत्नी दोघेही शिवारातून घरी दुचाकीवरून या रस्त्यावरून येत होतो. रस्त्यावर मोठे ख•s असल्यामुळे आमची दुचाकी घसरली. यामध्ये मला किरकोळ दुखापत झाली तर पत्नी लक्ष्मी हिच्या एका हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. आम्हा शेतकऱ्यांना रस्त्याच्या या समस्येमुळे दवाखान्याचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागला आहे.
– रामू तारिहाळकर
संबंधितांनी तोडगा काढावा

या संपर्क रस्त्याच्या आजूबाजूला कर्ले गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोज शेतावर जावेच लागते. पण सध्याच्या या ख•sमय रस्त्यामुळे आम्ही अक्षरश: वैतागून गेलो आहे. ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन जाताना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून यावर त्वरित तोडगा काढावा, अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे.
– भुजंग तारिहाळकर
रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा

सरकारचे या संपर्क रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावरून रोज सुमारे 500 ते हजार वाहनधारक ये-जा करतात. या भागातील अनेक गावांसाठी हा संपर्क रस्ता महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, मग आम्ही दाद कोणाकडे मागायची? कर्ले, बेळवट्टी, बाकनूर, बडस, बहाद्दरवाडी या भागातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, की या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे.
– नवनाथ खामकर
रस्त्याच्या बाजूचे भगदाड धोकादायक

बेळवट्टीहून रोज कर्ले येथे कामाला जावे लागते. मात्र, रस्त्यावर ख•dयांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याच्या बाजूला पडलेले भगदाड हे वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे. रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाहीत? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची पाहाणी करून रस्त्याचे कामकाज त्वरित हाती घ्यावे.
– संजय देसाई









