घटनास्थळी नटराज कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार होते
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील नटराज कंपनीजवळ मुख्य रस्त्यालगत हल्लेखोरांनी एका तरुणाच्या डोक्यात रॉड घालून निर्घृण खून केला. घटना शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदजवळ, कुपवाड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद झाल्याने चिडून संशयितांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे. दरम्यान, या खुनात एका अल्पवयीन युवकासह तिघांचा समावेश असून पसार झालेल्या दोघांना जेरबंद करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुपवाड पोलिसांच्या पथकाला यश आले.
संशयित साहिल उर्फ सुमित मधुकर खिल्लारी (वय २४, रा. बामणोली, मूळगाव बुलढाणा) व सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली) यांचा समावेश आहे. यातील तिसरा संशयित एक अल्पवयीन युवक अद्याप पसार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अटक केलेल्या दोघा संशयितांसोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी मयत उमेश पाटील व संशयित सोन्या उर्फ अथर्व शिंदे हे दोघे कुपवाड एमआयडीसीतील ऐरावत पॅकेजिंग कंपनीत सुपरवायझर होते. या दोघात बऱ्याच दिवसांपासून एका प्रेम प्रकरणात वाद सुरू होता.
या वादातून चिडून संशयित शिंदे याने त्याचे दोन साथीदार साहिल उर्फ सुमित खिल्लारी व एका अल्पवयीन युवकाच्या मदतीने पाटीलच्या डोक्यात रॉड घालुन खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. मृत उमेश पाटील शुक्रवारी सकाळी नियमितपणे कामावर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही.
रात्री पावणेदहाच्या सुमारास कंपनीतील एक कामगार घाईगडबडीने उमेशच्या घरी गेल्यावर त्याने उमेशच्या घरच्यांना उमेश नटराज कंपनीजवळ पडल्याचे सांगितले. उमेशचा भाऊ महेशने त्या कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता उमेश जखमी होऊन बेशुध्द पडलेला दिसला.
तत्पूर्वी हल्लेखोरांनी पलायन केले होते. घटनास्थळी नटराज कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार होते. जखमी उमेशला उपचारासाठी महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे यांनी आयुष हेल्पलाईन टिमच्च्या मदतीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलविले.
दरम्यान, उपचारापूर्वीच जखमी उमेश पाटीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उमेशचा खून केल्याची फिर्याद भाऊ महेश पाटील यांनी कुपवाड पोलिसात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीसप्रमुख संदीप घुगे, मिरजचे उपाधिक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅब पथकाने घटनास्थळाचे रक्ताचे नमुने तपासनीसाठी घेतले आहेत. खून करून पसार झालेल्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला.
शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कुपवाडच्या फॉरेस्ट ऑफिसजवळ लपलेल्या साहिल खिलारी याला तर कुपवाड पोलिसांच्या पथकाला सोन्या उर्फ अथर्व शिंदे याला कवलापूर विमानतळावर पकडण्यात यश आले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद झाल्याने हा खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.








