वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या रविवारी येथे झालेल्या इंडिया खुल्या 750 पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत थायलंडच्या कुनलावत वितिडसर्नने पुरुष एकेरीचे तर कोरियाच्या ऍन सेयुंगने महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत बलाढय़ तसेच दोनवेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱया डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेन आणि जपानच्या अकाने यामागुची यांना पराभव पत्करावा लागला.

रविवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या कुनलावतने 64 मिनिटांच्या कालावधीत डेन्मार्कच्या ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर ऍक्सेलसेनचा 22-20, 10-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव केला. कुनलावतचे हे सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील पहिले विजेतेपद आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या ऍन सेयुंगने जपानच्या यामागुचीचा 15-21, 21-16, 21-12 असा फडशा पाडत विजेतेपद पटकविले. मागील आठवडय़ात मलेशिया ओपनमध्ये या दोघींत झालेल्या लढतीत यामागुचीने विजय मिळविला होता. या स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद लियांग वेई केंग आणि वेंग चेंग यांनी पटकाविताना अंतिम सामन्यात मलेशियाच्या ऍरोन चिया आणि सो इक यांचा 14-21, 21-19, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव केला. दुहेरीच्या विभागात चीन बॅडमिंटनपटूच्या दोन जोडय़ांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माघार घेतल्याने दोन सामने रद्द करावे लागले. मिश्र दुहेरीचे जेतेपद जपानच्या युटा वटांबे आणि ऍरिसा हिगाशिनो यांना तर जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिहारु शिदा यांना महिला दुहेरीचे अजिंक्यपद देण्यात आले.









