ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधी/ मुंबई
मला कितीही शिव्या दिल्या, दोष दिले तरी मी सगळ्या समाजासाठी काम करणार. मराठा उपसमितीने चांगला तोडगा काढला आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेतला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार असल्याच फडणवीसांनी जाहीर केले.
हैदराबाद गॅझेटची तयारी होती.
हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यामध्ये सरसकट मागणीमध्ये कायदेशीर अडचणी होत्या. न्यायालयाचे निर्णय पाहता ते शक्य नव्हतं. ही गोष्ट आम्ही जरांगेंच्या लक्षात आणून दिली. आपल्या कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं तर ते व्यक्तीला दिलं जातं. त्यामुळे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही हे सांगितलं. त्याला जरांगे यांनी मान्यता दिली. त्यानंतर उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार केला.
रक्ताच्या नात्यातील लोकांना सर्टिफिकेट मिळणार
राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीतील सर्व प्रमुख नेत्यांचं मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने बसून, अभ्यास करून हा मार्ग काढला आहे. जे मराठवाड्यात राहणारे, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, रक्ताच्या नात्यातील कुणाचाही कुणबी उल्लेख असेल तर त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार. हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून, ज्यांना पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळणार. ज्यांच्याकडे पुरावा नाही त्याला याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘माझ्यावर टीका झाली तरी मी जराही विचलित झालो नाही, कारण समाजाला न्याय द्यायचा हेच ध्येय होतं. तो न्याय देताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, अन्यायाची भावना निर्माण होणार नाही असा कायदेशीर निर्णय करावा लागेल. मराठा असो, ओबीसी असो वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात, अशा भावना व्यक्त केल्या.
कटुता विसरुया, समाजासाठी काम करुया-मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे, मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. आता कटुता विसरुया आणि समाजासाठी कामाला लागुया, असेही जरांगे म्हणाले. तुमचं आमचं वैर संपले. तुम्ही या, नका येऊ, आमची ही विनंती आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. त्यावर, आपण हे उपोषण आज सोडूया, नंतर आपण मुख्यमंत्र्यांसमवेत भेटूया, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मदत केली, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोय, या मागण्या मान्य करू शकलो, असे विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन आपले उपोषण सोडले.









